नवी मुंबई : गेल्या काही दिवसापासून सीवूड्स परिसरात भुरट्या चोरट्यांची टोळी सक्रिय झाल्याचा दावा रहिवासी करत आहेत. भर उन्हात गुपचूप एखाद्या गृह संकुलात शिरून वाळत घातलेले कपडे, दरवाजा समोरील चपला, बागेतील साहित्य असे मिळेल ते चोरी करत असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. या टोळीत महिलांचा भरणा असून कोणी हटकले तर अरेरावीने दादागिरीने बोलत लगेच काढता पाय घेतला जातो. त्यामुळे पोलिसांची – महिला पोलीस कर्मचाऱ्यांसह दुपारी गस्त घालावी अशी मागणी सीवूड्समधील रहिवासी करत आहेत.
सीवूड्समधील सेक्टर ४६,४८ ,४८ ए तसेच ५० या परिसरात भुरट्या चोरट्यांची टोळी फिरत असल्याचा दावा रहिवासी करत आहेत. सध्या दुपारच्या वेळी ऊन अत्यंत कडक असल्याने रस्त्यांवर शुकशुकाट असतो, घराबाहेर पडणं लोकं टाळत आहेत. याचा फायदा घेत महिलांची टोळी ही गृहसंकुलात प्रवेश करते आणि चोऱ्या करत असल्याचं रहिवाशांचे म्हणणे आहे.
हेही वाचा… नवी मुंबई शहराचे आकर्षण असलेल्या वंडर्स पार्कच्या उद्घाटनावरुन वादंग?
“गॅलरीत वाळत घातलेले कपडे वा अन्य छोट्या मोठ्या वस्तू, उद्यानातील खोरे-फावडे-झारी-पाईप-दरवाजा समोरील तसंच चपला-बूट अशा वस्तूंची चोरी होते. या वस्तू फार मोठ्या किमतीच्या असतात असे नाही पण बाहेर जात असताना अचानक आपली चप्पलच नाही हे कळल्यावर मनस्ताप खूप होतो” अशी प्रतिक्रिया सोहम मराठे यांनी दिली आहे. तर दुपारच्या वेळेस अनेक घरात केवळ जेष्ठ नागरिक असतात, नोकरी किंवा व्यवसाय निमित्त अनेकजण घराबाहेर असतात, असं असतांना अशा भुरट्या चोरट्यांनी संधी मिळताच घरात प्रवेश करून चोरी वा दुखापत केली तर? अशी भीतीही शुभांगी कासट यांनी व्यक्त केली आहे .
गृह संकुलांनी सुरक्षा रक्षक अवश्य नियुक्त करावा व संकुलातील लोकांनी त्या सुरक्षा रक्षकाला त्याचेच काम करू द्यावे. याबाबत एन आर आय पोलिसांनाही दुपार गस्तीची विनंती केली आहे अशी माहिती माजी नगरसेवक भरत जाधव यांनी दिली आहे.