कौटुंबिक हिंसाचारावर नियंत्रण नसल्याचे चित्र
मागील चार वर्षांत कामोठे वसाहतीमधील ५७ महिलांवर शारीरिक व मानसिक अत्याचार झाल्याची नोंद पोलीस ठाण्यात करण्यात आली असून यातील ८ महिलांनी थेट आत्महत्येचा मार्ग निवडला आहे. पनवेल तालुक्यातील इतर पोलीस ठाण्यांच्या तुलनेत कामोठे पोलीस ठाण्याचा हा आकडा दुप्पट व तिप्पटीने मोठा असल्याने या वसाहतीमधील इतर महिलांच्या कौटुंबिक सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. सोमवारी डीएडचे शिक्षण घेतलेल्या प्रतिभा पाटसकर या सुशिक्षित महिलेच्या मृत्यूनंतर ही आकडेवारी उजेडात आली. २९ वर्षीय प्रतिभा हिच्यावर मागील पाच वर्षांपासून पती व सासरकरांनी अत्याचार केल्यामुळे तिनेही आपल्या माहेरच्या नातेवाईकांना फोन करून गळफास घेत असल्याची माहिती देऊन तिची चार वर्षांची मुलगी त्रिशा हिच्या नसा कापून स्वत: आत्महत्येचा मार्ग निवडला. प्रतिभाच्या या आत्महत्येनंतर कामोठे येथील कौटुंबिक अत्याचारामुळे त्रस्त असणाऱ्या महिलांनी स्वेच्छेने पुढे येऊन पोलिसांत याबाबत तक्रारी केल्यास त्या प्रश्नावर उपाय व पर्यायांसाठी इतर चांगले मार्ग महिलांसाठी खुले होतील, असे मत अनेक महिला पोलीस अधिकाऱ्यांकडून समोर येत आहे. परंतु या पीडित महिलांनी अत्याचार सहन करण्यापेक्षा पोलिसात येण्याकडे कल दाखविला पाहिजे असे पोलिसांचे मत आहे.
तालुक्यातील कामोठे, पनवेल शहर, खारघर व नवीन पनवेल या पोलीस ठाण्यांमध्ये कौटुंबिक अत्याचाराच्या अनेक तक्रारी दाखल होत आहेत. कामोठे पोलीस ठाणे हे त्यापैकी एक आहे. शहरी परिसरामुळे येथे सुशिक्षित वाटणाऱ्यांमध्येच या कौटुंबिक अत्याचारांचे प्रमाण मोठे आहे. सोमवारी प्रतिभा हिने आत्महत्येपूर्वी आपल्या माहेरच्यांना आपला शेवटचा निर्णय कळवला. प्रतिभाच्या भावाने प्रतिभाचा पती विक्रमादित्यला याबाबत फोनवर माहिती दिल्यावर गळफास घेतलेली प्रतिभा व हाताच्या नसा कापल्यामुळे रक्तबंबाळ झालेली त्रिशा घरात विक्रमादित्यला सापडली. विक्रमादित्य हा पदवीधर असला तरीही त्याचे नोकरीतील सातत्य नसणे, कर्जाने रक्कम घेणे व मद्यपीच्या रोजच्या त्रासाला वैतागून प्रतिभाने हा मार्ग निवडल्याचे तिने मृत्यूपूर्वी लिहिलेल्या एक पानी पत्रात म्हटले आहे. पश्चात मुलीच्या नशिबी मरणयातना न येण्यासाठी तिने त्रिशाची जीवनयात्रा संपविण्याचा प्रयत्न केला. आज त्रिशावर कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिसांना मृत्यूचे कारण समजावे म्हणून प्रतिभाने स्वत:च्या हातावरही विक्रमादित्य याला जबाबदार असल्याचे पेनाने लिहिले होते. या घटनेनंतर पोलिसांनी विक्रमादित्यला लगेचच अटक केली. मात्र प्रतिभाने तिच्यावरील अत्याचारासाठी पोलिसांना संपर्क साधला असता तर आजची ही घटना टळली असती असे पोलिसांचे मत आहे.
आत्महत्येच्या निर्णयापूर्वी पोलीस, सामाजिक संघटना व समुपदेशकांना संपर्क साधा. महिलांनी व्यक्त होऊन स्थानिक पोलीस ठाणे आणि बेलापूर पोलीस आयुक्तालयातील महिला साहाय्य कक्ष व दक्षता समितीसमोर व्यथेची दाद मागता येईल. नवी मुंबई महिलांच्या सुरक्षेसाठी २४ तास १०३ हा टोल फ्री क्रमांक उपलब्ध केला आहे. नवी मुंबईत वाशी व कोपरखैरणे येथे स्त्री मुक्ती संघटनेचे शेल्टर होमची सोय आहे. सिडकोने नवी मुंबई व सिडको वसाहतींमधील महिलांसाठी कळंबोली समाज मंदिर येथे मनस्वी स्त्री संसाधन केंद्रातून समुपदेशन सुरू केले आहे.मंगळवार, गुरुवार व शुक्रवार दुपारी १२ ते ३ या वेळेत केंद्र सुरू राहील.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा