रसायनीतील ‘पिल्लई अभियांत्रिकी’च्या विद्यार्थ्यांकडून रोबोची निर्मिती
रसायनी येथील पिल्लई अभियांत्रिकी महाविद्यालयात दहशतवादी कारवायांच्याविरोधात लढणारा रोबो तयार करण्यात आला आहे. महाविद्यालयात झालेल्या प्रदर्शनात रोबोची काही प्रात्यक्षिके दाखविण्यात आली.
अभियांत्रिकी शाखेत शेवटच्या वर्षांला असलेल्या विद्यार्थ्यांनी ही करामत साधली आहे. यात तीन प्रकारचे रोबो आहेत. यातील एका रोबोचे नाव ‘वीर’ आहे. त्याच्याकडे बॉम्ब निकामी करण्याचे तंत्र आहे. तर ‘द्रोण’ हा रोबो हल्ला करण्यास सज्ज आहे. याशिवाय टेहळणीसाठी एका रोबोची निर्मिती करण्यात आली आहे.
दहशतवादविरोधी कारवायांमध्ये भारतीय जवानांना मदत म्हणून या रोबोचा वापर करता येईल, असे विद्यार्थ्यांनी स्पष्ट केले. या वेळी नवी मुंबई गुन्हे अन्वेषण विभागाचे उपायुक्त दिलीप सावंत, सहायक पोलीस अधीक्षक अतीश वाघ उपस्थित होते.
सुरक्षाविषयक संशोधनात विद्यार्थ्यांना अधिकाधिक वाव मिळावा हा या उपक्रमाचा उद्देश होता. यातून सामाजिक आणि पर्यावरणविषयक जबाबदारी त्यांच्या लक्षात येईल. त्यांच्या कौशल्याचा फायदा देशाला होईल, अशी अपेक्षा या वेळी उपस्थितांनी व्यक्त केली. महाविद्यालयाचे सीईओ के. एम. वासुदेवन म्हणाले, अशा कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांची क्षमता लक्षात येते. त्यांचे कष्ट सर्वासमोर येतात. त्यांच्यात सामाजिक भावना रुजविता येते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा