उरण : पिरवाडी ते केगाव -माणकेश्वरला जोडणाऱ्या १०.५० कोटी खर्चाच्या कोस्टल रोडच्या पहिल्या टप्प्याचे काम दृष्टीपथात येऊ लागले असल्याची माहिती महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डाचे कार्यकारी अभियंता सुधीर देवरे यांनी दिली. महाराष्ट्र मेरिटाईम बंदर विभागाच्या अखत्यारीत दोन टप्प्यांत सुरू असलेल्या १०.५० कोटी खर्चाच्या पिरवाडी-माणकेश्वर दरम्यानच्या सव्वा किमी लांबीच्या या रस्त्याच्या कामामुळे नेव्ही, केगावची वाहतूक अगदी सुकर होण्यास मदत होणार आहे. त्यामुळे वाहतूक कोंडीचा ताणही कमी होणार आहे.

सात मीटर रुंदीचा रस्ता पीरवाडी-माणकेश्वर दरम्यान किनाऱ्यावर समुद्रात मोठमोठ्या दगडांचा भराव टाकून दोन टप्प्यांत करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यांत चार कोटी खर्चून ५५० मीटरचा रस्ता करण्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे. तर दुसऱ्या टप्प्यात ६५० मीटर लांबीच्या रस्त्याचे काम करण्यात येणार आहे. दोन्ही टप्प्यांमध्ये होणाऱ्या कामावर सुमारे १०.५० कोटी खर्च अपेक्षित आहे. हा रस्ता डब्ल्यूबीएमने करण्यात येणार असून येत्या महिन्याभरात या कोस्टल रोडचे पहिल्या टप्प्याचे काम पूर्णत्वास जाईल अशी माहिती महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डाने दिली आहे.

उरणमध्ये नागाव(पिरवाडी) आणि केगाव हे दोन समुद्र किनारे आहेत. या दोन्ही किनाऱ्यावर मोठया प्रमाणात शेजारील मुंबई, नवी मुंबई आणि पनवेल मधील पर्यटक येत आहेत. या दोन्ही समुद्र किनाऱ्यावर ये-जा करण्यासाठी या मार्गाचा वापर केला जाणार आहे. सध्या पिरवाडी येथून केगाव येथे जाण्यासाठी पाच ते सहा किलोमीटरचे अंतर पार करावे लागत आहे. हे अंतर दीड ते दोन किलोमीटरने कमी होणार आहे. याचा फायदा येथील नागरिकांनाही होणार आहे. हे काम जून २०२५ पर्यंत पूर्ण करण्याचा मानस असून उर्वरित कामही लवकरात लवकर पूर्ण केले जाईल अशी माहिती मेरीटाईम बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी दिली.