नवी मुबंई : नवी मुबंई महानगरपालिकेच्या स्वच्छतेमधील सतत उंचाविणाऱ्या मानांकनात येथील जागरूक स्वच्छताप्रेमी नागरिकांचा सिंहाचा वाटा आहे. स्वच्छतेचे कार्य करीत असताना त्यामध्ये नेहमीच नाविन्यपूर्णता आणण्याचा प्रयत्न करण्यात येत असून लोकसहभागावर विशेष भर दिला आहे. याकरिता प्रभाग पातळीवर स्वच्छताकार्याची निकोप स्पर्धा व्हावी व यामधून स्वच्छता व्हावी यादृष्टीने तिमाही ‘स्वच्छ मंथन स्पर्धा’ घेतली जात असून या अनुषंगाने लोकसहभागातून मोठ्या प्रमाणावर उपक्रम राबविले जात आहेत.
विद्यार्थ्यांचे पासबुक असणारा ‘ड्राय वेस्ट बँक’ हा उपक्रम राबविला जात आहे. त्याच प्रमाणे आगामी कालावधीत येत्या शैक्षणिक वर्षात ‘ग्रो विथ म्युझिक’ या अभिनव उपक्रमाव्दारे संगीतातून स्वच्छतेचे संस्कार करण्यात येत आहेत. नवी मुंबई मिशनचे ब्रँड ॲम्बेसेडर पद्मश्री शंकर महादेवन यांच्या संकल्पनेतून संगीताच्या माध्यमातून स्वच्छतेचा संस्कार मुलांच्या कोवळ्या मनात रुजविणाऱ्या ‘ग्रो विथ म्युझिक’ अर्थात संगीतासोबत विकास हा अभिनव उपक्रम राबविण्यास येत्या शैक्षणिक वर्षापासून महानगरपालिका शाळांमध्ये सुरुवात करण्यात येणार आहे. अशा प्रकारचा स्वच्छतेला संगीताशी जोडणारा आगळा वेगळा उपक्रम राबविणारी नवी मुंबई ही देशातील पहिलीच महानगरपालिका असेल असा विश्वास आयुक्त राजेश नार्वेकर यांनी व्यक्त केला आहे.