नवी मुंबई : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचा पहिला टप्पा लवकरच सुरू होण्याची चिन्हे दिसत असताना सिडको प्रशसानाने या विमानतळाभोवती अत्याधुनिक सुविधांनी सज्ज असलेल्या अभिनव शहरांची उभारणी करण्याचा निर्णय पक्का केला आहे. सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी नुकत्याच मांडलेल्या अर्थसंकल्पात विमानतळालगतच्या पुष्पकनगराजवळ शेकडो एकर जमिनीवर लॉजिस्टिक पार्क तसेच ‘अटल सेतू’लगतच्या उपनगरांमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचे शैक्षणिक शहर (एज्युसिटी) उभारण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. याच भागात मुंबई महानगर विकास प्राधिकरणामार्फत तिसरी मुंबई उभारण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे.

महामुंबईचे पालकत्व भूषविणाऱ्या सिडकोचा अर्थसंकल्प गेल्या आठवड्यात सादर करण्यात आला. या अर्थसंकल्पात विजय सिंघल यांनी पावणेसात हजार कोटी रुपयांचा खर्च पणन विभाग, वसाहत विभागाचे व्यवस्थापन, अग्निशमन दल, विमानतळ, पालघर, यूआरएस, प्रशासन, आस्थापनासाठी करण्याचे निश्चित केले आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात गृहनिर्माणासाठी ३,२५१ कोटी रुपये आणि पाणीपुरवठ्यासाठी ११२० कोटी रुपयांचा खर्च दर्शविण्यात आला आहे. महामुंबईच्या प्रदेशात वाढत्या नागरीकरणामुळे पाण्याचा प्रश्नही भविष्यात गहन होईल अशी भीती आतापासूनच व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर कोंढाणे धरण प्रकल्पातून वाढीव पाणी मिळविण्यासोबतच हेटवणे धरण प्रकल्पाचे पाणी सिडको नगरांपर्यंत आणण्यासाठी विशेष प्रकल्पांची आखणी या अर्थसंकल्पात करण्यात आली आहे.

सिंघल यांनी १४,१२० कोटी रुपयांचा १० कोटी शिलकीचा अर्थसंकल्प सादर केला. सध्या पाणीपुरवठ्याचा ज्वलंत प्रश्न सिडको वसाहतींमध्ये आहे. यावर मात करण्यासाठी एमडी सिंघल यांनी पुढाकार घेतला असून कोंढाणे व हेटवणे या दोन धरण प्रकल्पांसोबत जलशुद्धीकरण केंद्र, जलबोगदे व जलवाहिनीसाठी सिडको मंडळ ११२० कोटी रुपये खर्च करणार आहे. मुंबई ते थेट नवी मुंबई अशा मेट्रो वाहिनीला जोडण्यासाठी सिडकोने यंदाच्या वर्षात सव्वासहाशे कोटी रुपयांची तरतूद केली आहे. याव्यतिरिक्त मागील आर्थिक वर्षात सिडकोने नवी मुंबई विमानतळ अधिसूचित प्रभाव क्षेत्र (नैना) प्रकल्पासाठी सिडकोने साडेसात हजार कोटी रुपयांची विकासकामांसाठी कंत्राटदार कंपनीची निवड केली. त्यापैकी काहींना आगाऊ रक्कमसुद्धा दिली. नैना प्रकल्पाला शेतकऱ्यांकडून होत असलेला विरोध पाहता सिडकोने यंदाच्या आर्थिक वर्षात ५२७ कोटी रुपयांची तरतूद केली आहे. सिडकोने या अर्थसंकल्पात रेल्वे लेखा शीर्षकाखाली ६५३ कोटी रुपयांची तरतूद केली आहे.

अर्थसंकल्पातील सर्वाधिक खर्च म्हणजे ६,८६८ कोटी रुपये हे सिडकोचा आस्थापना, सिडकोने वेळोवेळी विविध कामांसाठी नेमलेल्या सल्लागार कंपनी, विमानतळाला जोडणाऱ्या दळणवळण प्रकल्प, घरविक्रीसाठी नेमलेली सल्लागार कंपनी, पालघर प्रकल्प आणि प्रशासनावर केला जाणार आहे. अजूनही ६७ हजार घरांचे बांधकाम अंतिम टप्प्यात आहे. यासाठी यंदाच्या आर्थिक वर्षात ही कामे पूर्ण करण्यासाठी सिडको गृहनिर्माणावर ३,२५१ कोटी रुपये खर्च करणार आहे.
नवे पार्क, नव्या सुविधा

सिडकोने पुष्पकनगर परिसरात यापूर्वीच लॉजिस्टिक पार्कसाठी वेगवेगळ्या प्रकल्पांची आखणी तसेच भूसंपादनासाठी नियोजन सुरू केले आहे. उरण परिसरात जवाहरलाल नेहरू बंदराचा एकीकडे विस्तार होत असताना सिडकोने याच दिशेने जाणाऱ्या मार्गावर भव्य असे लॉजिस्टिक पार्क उभारण्याचे नक्की केले आहे. विमानतळ, जेएनपीए बंदर, अटल सेतू अशा महत्त्वाच्या त्रिकोणात हे पार्क उभारले जाणार आहे. याच भागात आंतरराष्ट्रीय दर्जाचे शैक्षणिक शहर वसविण्याची संकल्पनाही सिडकोने पुढे आणली आहे. या प्रकल्पांसाठी सिडकोने यंदाच्या आर्थिक वर्षात १,०७३ कोटी रुपयांची तरतूद केली आहे.

सिडकोचा २०२५-२६ चा अर्थसंकल्प सामान्य नागरिकांच्या प्रत्येक गरजांशी संबंधित असणाऱ्या चार मूलभूत तत्त्वांवर आधारित आहे. पारदर्शकता, उत्तरदायित्व, उत्तम लेखा पद्धती आणि कार्यप्रदर्शन ही या अर्थसंकल्पाची मुख्य उद्दिष्टे आहेत. -विजय सिंघल, व्यवस्थापकिय संचालक, सिडको