नवी मुंबई : नवी मुंबई महानगर पालिकेने ‘ज्वेल ऑफ नवी मुंबई’च्या बाजूला नवीन वृक्ष लागवड करण्यासाठी २०१९ मध्ये स्मृती उद्यान निर्माण केले होते. शहरवासियांनी आपल्या नव्या-जुन्या आठवणींना उजाळा देण्यासाठी झाड लावून वृक्षरूपी स्मृतींची जोपासना करावी असा हेतू ठेवून नेरुळ येथील ‘ज्वेल ऑफ नवी मुंबई’च्या बाजूला मोकळ्या भूखंडावर हे उद्यान निर्मिती करण्यात येणार होती. मात्र ही संकल्पना बारगळली असून या स्मृतीरुपी वृक्षांच्या स्मृती हरवलेल्या निदर्शनास येत आहे.
नेरुळ से.२६ येथील ‘ज्वेल ऑफ नवी मुंबई’ हे पाम बीच या शहरातील मुख्य रस्त्यालगत आहे. या ठिकणी सकाळी आणि सायंकाळी नेहमीच नागरिकांची वर्दळ असते. येथे अधिक वृक्ष लागवड करून परिसरात हिरवळ निर्माण करण्यासाठी ५ एकर जागेत हे स्मृती उद्यान तयार करण्यात येत होते.
बालकाच्या जन्माच्या आनंदानिमित्त ‘शुभेच्छा वृक्ष’, विवाहाचे औचित्य साधून ‘शुभमंगल वृक्ष’, परीक्षा व अन्य यशाबद्दल ‘आनंद वृक्ष’, सासरी जाणाऱ्या मुलीसाठी शुभेच्छा म्हणून ‘माहेरची झाडी’, प्रियजनांच्या मृत्यूनंतर ‘स्मृतीवृक्ष’ अशा विविध प्रसंगाची आठवण वृक्षरोपी लागवड करुन जपण्याची संकल्पना होती. वृक्षलागवडीकरीता इच्छुक नागरिकांकडून प्रतिवृक्ष एक हजार रुपयेही घेण्यात आले होते. १ हजार वृक्ष लागवडीचे लक्ष्य ठेवण्यात आले होते. मात्र त्याआधीच ही योजना गुंडाळण्यात आली आहे.
२०१९ मध्ये स्मृती उद्यान संकल्पना अमलात आणली होती. मात्र मध्यंतरीच्या कालावधी ती थांबवण्यात आली. याबाबत आयुक्तांशी चर्चा करून पुन्हा कशी नव्याने सुरू करता येईल याबाबत विचारविनिमय सुरू आहे. – किसन पलांडे, उपायुक्त, परिमंडळ एक उद्यान विभाग, नमुंमपा