पूनम सकपाळ, नवी मुंबई
पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी तसेच शहराच्या सौंदर्यीकरणात भर पडावी आणि त्यानिमित्ताने शहरात हिरवळ निर्माण व्हावी. या हेतूने स्वच्छता सर्वेक्षणाच्या अंतर्गत शहरातील ठिकठिकाणी लावलेला नाल्यांच्या जाळीवर व्हर्टिकल गार्डन म्हणजेच शोभेच्या झाडांची भिंत तयार करण्यात आली आहे. यासाठी लाखो रुपये खर्च करून हे व्हर्टिकल गार्डन तयार करण्यात आली असून यासाठी लागणाऱ्या पाण्याअभावी ही झाडे आता पूर्णपणे सुकत आहेत.
स्वच्छ भारत अभियान अंतर्गत नवी मुंबई महागर पालिकेच्या वतीने शहरात ठीक ठिकाणी ही झाडांची भिंत म्हणजेच वर्टीकल गार्डन तयार करण्यात आले आहेत. यासाठी वेगवेगळ्या प्रकारची झाडांची निवड करून ती लावली जात आहेत. नवी मुंबई शहरात सध्या मोठ्या प्रमाणावर औद्योगिक कंपन्या, वाहने , विकास कामे यामुळे मोठ्या प्रमाणावर वायू प्रदूषण होत आहे. तसेच वातावरणातील कार्बन डाय ऑक्साईडचे प्रमाणही वाढत आहे . त्यामुळे शहरातील प्रदूषण पातळी कमी करण्यासाठी तसेच ऑक्सिजनचे प्रमाण वाढवण्यासाठी शहरात मोठ्या प्रमाणावर हिरवळ निर्माण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आली आहे. शहरात विविध ठिकाणी अशी झाडांची भिंत उभारण्यात येत आहे. या व्हर्टिकल गार्डनमध्ये लावण्यात येणाऱ्या झाडांमधून ऑक्सीजनची निर्मिती होत असते, त्यामुळे हे व्हर्टिकल गार्डन शहरातील वायु प्रदूषण कमी करण्यासाठी मदत करेल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
हेही वाचा >>> रायगड : राे हाऊससाठीचा भूखंड मालक परदेशात गेल्यावर परस्पर हडपला, तिघांविरुद्ध गुन्हा
बेलापूर- दिवाळे गाव येथील नाल्यावर शोभेच्या झाडांची भिंत उभारण्यात आली होती. मात्र पाण्याअभावी झाडे पूर्णपणे सुकली आहेत. भिंतीवर लावलेल्या रोपांना वेळीच पाणी दिले नाही तर झाडे लवकर सुकतात तसेच केवळ आणि केवळ ठिबक सिंचन वापरावे असे मत वनस्पती तज्ञांकडून व्यक्त करण्यात येत आहे. या व्हर्टिकल गार्डन अर्थात उभी बाग झाडांच्या भिंतीसाठी वातावरणाशी सुसंगत अशी रोपांची निवड करणे तसेच यासाठी केवळ ठिबक सिंचनाद्वारे ही झाडांना व्यवस्थित रित्या पाणी देऊन त्यांची उत्तम निगा राखली जाते, तसेच संगोपनही व्यवस्थित होते. परंतु नवी मुंबईत सध्या विविध ठिकाणी उभारण्यात आलेल्या व्हर्टिकल गार्डनला पाण्याचा प्रश्न उद्भवत आहे. ज्या ठिकाणी ही झाडांची भिंत उभारण्यात आलेली आहे, त्या ठिकाणी पाण्याचे सुविधा उपलब्ध नसल्याने झाडांना टँकरद्वारे पाणी देण्यात येते परंतु या झाडांसाठी केवळ ठिबक सिंचन फायदेशीर असून ठिबक सिंचनाद्वारे ही झाडे वातावरणात तग धरू शकतील. परंतु सध्या नवी मुंबई महानगरपालिकेकडे ज्या पाण्याचा अभाव निर्माण होत असल्याने झाडे सुकत आहेत. त्यामुळे याकडे वेळीच लक्ष दिले नाही तर ही झाडे सुकून खर्च करण्यात आलेला पैसा पाण्यात जाण्याची भीती वर्तविली जात आहे.
शहरात ४७ ठिकाणी झाडांची भिंत
नवी मुंबई महापालिकेने शहरातील नाल्यावर लोखंडी जाळी बसविल्या आहेत. त्यापैकी बऱ्याच ठिकाणी या लोखंडी जाळीचा आधार घेत व्हर्टिकल गार्डन तयार करण्यात आले आहे. शहरातील बेलापूर, नेरुळ, तुर्भे, वाशी, कोपरखैरणे, घणसोली, रबाळे, ऐरोली या विभागात ४७ ठिकाणी ही झाडांची भिंत उभारण्यात आली आहे. परंतु काही व्हर्टिकल गार्डनमधील झाडे पाण्याअभावी सुकली आहेत. अशा १० ठिकणी पुन्हा दुसरी झाडे लावण्यात येणार असल्याची माहिती उद्यान उपायुक्तांनी दिली आहे.
नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने शहरात विविध ठिकाणी व्हर्टिकल गार्डन उभारण्यात आलेले आहेत .परंतु या झाडांसाठी देण्यात येणारी पाण्याची सुविधा अपुरी पडत असून ठिबक सिंचनाद्वारे पाणीपुरवठा कसा करता येईल याबाबत नियोजन सुरू आहे.
नितीन नार्वेकर ,उपायुक्त , उद्यान विभाग