‘माझी नवी मुंबई, माझा अभिमान’ म्हणत नवी मुंबईकर धावले

‘माझी नवी मुंबई, माझा अभिमान’ म्हणत हजारो स्वच्छताप्रेमी नागरिक मंगळवारी ‘स्वच्छता रन’ मध्ये सहभागी झाले होते. नवी मुंबईच्या एकतेचे दर्शन घडवत स्वच्छतेचा संदेश  प्रसारित केला. या वेळी नवी मुंबईचे महापौर जयवंत सुतार यांनी शहरात स्वच्छता ठेवून देशभरात आपल्या शहराचा नामांकन उंचावू असा विश्वास व्यक्त केला.

महात्मा गांधी जयंती आणि ‘स्वच्छ भारत मिशन’च्या चौथ्या वर्धापननिमित्त १५ सप्टेंबर ते ०२ ऑक्टोबर या कालावधीत देशभरात स्वच्छता पंधरवडा साजरा करण्यात आला. या अंतर्गत ‘स्वच्छता रन’ आयोजित केली होती. यात ५५०० नवी मुंबईकरांनी सहभाग घेतला.

नेरूळ येथील वझिराणी स्पोर्ट्स क्लब सर्कलपासून महापालिका मुख्यालय इमारतीपर्यंत पामबीच मार्गावर पाच किलोमीटर अंतराची ही रन झाली. या वेळी सर्वानी प्लास्टिकमुक्ततेची व स्वच्छतेची शपथ घेतली.

याप्रसंगी आमदार मंदा म्हात्रे, आमदार संदीप नाईक, महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन., सभागृह नेते रवींद्र इथापे, नवी मुंबई स्वच्छता मिशन तदर्थ समिती सभापती नेत्रा शिर्के यांच्यासह लोकप्रतिनिधी व नागरिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.