प्लास्टिकच्या कचऱ्याचे काय करायचे हा प्रश्न नवी मुंबई महापालिकेने सोडवला आहे. प्लास्टिकमिश्रित डांबराचा वापर रस्तेबांधणीसाठी करण्यास महापालिकेने सुरुवात केली आहे. हे तंत्र वापरून १०० मीटर लांबीचे १० रस्ते बांधण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. नवी मुंबई महानगरपालिकेच्या तुर्भे येथील शास्त्रोक्त घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पात घनकचऱ्यापासून खत निर्मिती व फ्युएल पॅलेट्स तयार केले जात आहेत. तिथेच कचऱ्यातील प्लास्टिकपासून त्याचे दाणे (ग्रॅन्युल्स) तयार केले जातात. महानगरपालिकेच्या स्थापत्य विभागाने आता हे दाणे रस्त्यांच्या डांबरीकरणासाठी वापरण्यास सुरुवात केली आहे. प्लास्टिक निर्मूलनाचा हा अत्यंत प्रभावशाली व फायदेशीर मार्ग ठरत आहे. प्लास्टिकचे दाणे डांबरी रस्ता तयार करताना खडी व डांबरासोबत उच्च तापमानात वितळवण्यात येतात. अशा प्रकारे तयार केलेल्या अस्फाल्ट काँक्रीटचा थर वेअरिंग कोट म्हणून रस्त्यावर वापरण्यात महानगरपालिकेने सुरुवात केली आहे.
एमआयडीसी क्षेत्रातील खड्डे पडलेल्या रस्त्यांवर गेल्या चार दिवसांपासून प्लास्टिकयुक्त डांबर टाकले जात आहे. पालिकेचा हा प्रयोग यशस्वी झाला आहे. हा प्रयोग वर्षभर विभिन्न हवामानात किती तग धरतो, याचा अभ्यास केला जाईल. हे डांबर उत्तम टिकल्यास पुढील काळात सर्व डांबरी रस्त्यांमध्ये प्लास्टिकचा वापर करण्यावर भर दिला जाईल. महानगरपालिकेच्या अभियांत्रिकी विभागाच्या या अभिनव प्रयोगामुळे नवी मुंबई महानगरपालिकेची पर्यावरणप्रेमी महापालिका, अशी ओळख झाली आहे.
प्लास्टिकयुक्त डांबरीकरणाचे लाभ
’ अशा प्लास्टिकयुक्त डांबरीकरणामुळे रस्त्यांची लवचिकता वाढेल व त्याला भेगा पडणार नाहीत, असा पालिकेचा दावा आहे.
’ वरील थरामध्ये प्लास्टिकचा वापर केल्याने रस्त्यावर पडणारे पाणी रस्त्यात झिरपणार नाही आणि पर्यायाने रस्त्यांचे आयुष्य वाढेल.
’ प्लास्टिकच्या पुनर्वापराचा हा प्रभावी मार्ग असल्यामुळे पर्यावरण रक्षणाचे लक्ष्यही साधले जाणार आहे.
’ रस्त्याचे आयुष्यमान वाढल्याने त्याच्या देखभाल व दुरुस्ती खर्चात बचत होऊन हा निधी इतर महत्त्वाच्या नागरी कामांमध्ये खर्च केला जाऊ शकेल.