देशात पहिले प्लास्टिकमुक्त शहर नवी मुंबई होईल, असा पालिका आयुक्तांनी दाखवलेला विश्वास नवी मुंबईकर सार्थ ठरवतील असे दिसत नाही. कारवाईत नसलेले सातत्य व जनजगृतीकडे होत असलेल्या दुर्लक्षामुळे आजही शहरात प्लास्टिकचा वापर होताना दिसत आहे. संकलनासाठी विभागवार केलेली केंद्रे ओसाड पडली असून तेथील संकलनही ठप्प झाले आहे.
महानगरपालिकेच्या आठही विभाग कार्यालयांत प्लास्टिक संकलन केंद्रात ठेवल्या जाणाऱ्या विशेष डब्यांचा शुभारंभ करण्यात आला, परंतु त्याच्या योग्य प्रचाराअभावी या ठिकाणी प्लास्टिक जमा करताना नागरिक दिसत नाहीत.
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पालिकेने सर्व आठही विभाग कार्यालय क्षेत्रात प्लास्टिक व थर्माकोलमुक्त विशेष मोहिमेत ९ टन इतक्या मोठय़ा प्रमाणावर प्लास्टिक संकलित करण्यात आले व १५ लाख रुपयांपेक्षा अधिक दंडात्मक रक्कम वसूल करण्यात आली होती. मात्र त्यानंतर कारवाईत सातत्य न राहिल्याने प्लास्टिकचा वापर वाढला असल्याचे चित्र आहे. भाजी मार्केट, किरकोळ विक्रेते यांच्याकडे प्लास्टिक पिशव्यांचा वापर होत असल्याचे आजही पाहायला मिळत आहे. नागरिकांनी नवी मुंबई शहर प्लास्टिक व थर्माकोलमुक्त करण्यासाठी स्वत:पासून सुरुवात करावी. काहीही खरेदी करताना कापडी पिशवी बरोबर ठेवावी. दुकानदाराकडून प्लास्टिक पिशवी स्वीकारू नये. ज्या दुकानात प्लास्टिक पिशव्या आढळतील त्याची माहितीही पालिकेला द्यावी. सर्वाच्या सहकार्यातून शहर प्लास्टिकमुक्त करणे हे ध्येय ठेवावे.
-दादासाहेब चाबुकस्वार, उपायुक्त परिमंडळ १