नवी मुंबई : भारत देश हा केवळ भौगोलिक सीमांनी बांधलेला भूप्रदेश नाही. त्याला जीवन संस्कृती आहे, दीर्घ जीवन परंपरा लाभली आहे. भारताच्या केंद्रस्थानी अध्यात्म आहे. त्यामुळे भारताला समजून घ्यायचे असेल तर अध्यात्म आत्मसात करावे लागेल असे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवी मुंबईतील खारघर येथे व्यक्त केले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

खारघरच्या सेंट्रल पार्क येथे नऊ एकर परिसरात नव्याने उभारण्यात आलेल्या ‘इस्कॉन’ मंदिराचा लोकार्पण सोहळा पंतप्रधान मोदी यांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी राज्यपाल सी. पी. राधाकृष्ण, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, इस्कॉनचे सुरदास प्रभु उपस्थित होते.

‘‘भारताकडे जे बौद्धिक दृष्टीने बघतात त्यांना भारत वेगवेगळ्या भाषा आणि प्रांताचा समूह दिसतो. पण तुम्ही सांस्कृतिक जाणीवेतून पाहिले तर भारताचे विराट स्वरूप पाहायला मिळेल. पूर्वेकडे चैतन्य महाप्रभू तर पश्चिमेकडे नामदेव, तुकाराम, ज्ञानेश्वर यांनी आध्यात्मिक अमृताचे वाटप केले. श्रीवल्लभ प्रभूंनी गीताज्ञान सर्वांपर्यंत पोहोचवले. वेगवेगळ्या प्रांतात जन्मलेल्या संतांनी भक्तीच्या माध्यमातून समाजात चेतना जागवण्याचे आणि ज्ञान पोहोचवण्याचे काम केले. समाजाला दिशा देण्याचा प्रयत्न केला,’’ असे मोदी म्हणाले.

हेही वाचा >>> नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि. बा. पाटील यांचेच नाव; वनमंत्री गणेश नाईक यांचे आश्वासन

यावेळी पंतप्रधान मोदी यांनी सरकारने केलेल्या कामाचाही उल्लेख केला. ते म्हणाले की, ‘‘देशवासीयांच्या हितासाठी पूर्ण समर्पणाने आणि सेवेच्या भावनेने सतत काम करत असल्याबद्दल मला समाधान आहे. प्रत्येक घरात शौचालये बांधली जात आहेत, प्रत्येक गरीब महिलेला उज्ज्वला गॅस जोडणी दिली जात आहे, नळाचे पाणी प्रत्येक घरात उपलब्ध करून दिले जात आहे. प्रत्येक गरीब व्यक्तीला ५ लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार देणे, ७० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या प्रत्येक वृद्ध व्यक्तीला या सुविधेच्या कक्षेत आणणे, प्रत्येक बेघर व्यक्तीला कायमस्वरूपी घरे उपलब्ध करून देणे, ही कामे सेवा आणि समर्पणाच्या भावनेने केली गेली आहेत.’’

सरकार कृष्णा सर्किटच्या माध्यमातून देशातील विविध तीर्थक्षेत्रे आणि धार्मिक स्थळे जोडत आहे. हे सर्किट गुजरात, राजस्थान, हरियाणा, उत्तर प्रदेश आणि ओडिशापर्यंत विस्तारलेले आहे. आगामी काळात मंदिर श्रद्धा आणि देशाच्या चेतनेचे केंद्र ठरेल असा विश्वासही मोदींनी व्यक्त केला. यावेळी त्यांनी इस्कॉन चळवळीची, तरुणांना मानवी मूल्यांना चालना देणारा समाज घडवण्यासाठी प्रेरणा देत असल्याबद्दल प्रशंसा केली.

सामर्थ्य नौदलाचे…

आयएनएस सूरत, आयएनएस निलगिरी आणि आयएनएस वागशिर यांच्या लोकार्पणासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईत आले होते. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांचे स्वागत केले. तत्पूर्वी नौदलाकडून युद्धनौका व पाणबुडीवरील सुरक्षेचा आढावा घेण्यात आला. दोन युद्धनौका व पाणबुडीच्या समावेशांमुळे देशाचे सागरीसामर्थ्य अधिक वाढले आहे.

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pm narendra modi inaugurates iskcon temple at kharghar in navi mumbai zws