कचरापेटीत सापडलेल्या दहा दिवसांच्या अर्भकाचा सांभाळ
मंगलमूर्ती विघ्नहर्त्यांला निरोप देण्यात अवघे जग दंग असताना अनंत चतुर्दशीच्या रात्री कामोठेतील जवाहर इस्टेट औद्योगिक वसाहतीच्या एका निर्जन रस्त्यावर कचऱ्याच्या ढिगातून एका तान्हुलीच्या रडण्याचा आवाज परिसरातील काळोख चिरून टाकत होता. परिसरात काम करणाऱ्या एकाने ते दृश्य पाहिले आणि पोलिसांना बोलावले. पोलिसांनी दहा दिवसांच्या त्या स्त्री अर्भकाला तातडीने रुग्णालयात दाखल केले. पोलिसांच्या तत्परतेने बाळाचे प्राण वाचले, पण तिच्या पालकांचा काहीच पत्ता नव्हता. मग एमजीएम रुग्णालयच त्या इवल्याशा जिवाचे घर बनले आणि कामोठे पोलीस ठाणे तिचे आईवडील. जन्मदात्यांनी उकिरडय़ावर फेकून दिलेल्या त्या ‘बेबी ऑफ कामोठे पोलीस स्टेशन’ने गेल्या पाच दिवसांपासून खाकी वर्दीलाही लळा लावला आहे.
कामोठे वसाहतीलगतच्या जवाहर इस्टेट औद्योगिक वसाहतीमधील एका आडोशा रस्त्याला काळोखात कंपनीच्या शेजारी कचऱ्याच्या ढिगात उभ्या असलेल्या हातगाडीवर हे अर्भक सापडले. डासांच्या चाव्यांनी बेजार झालेली ती तान्हुली जिवाच्या आकांताने रडत होती, तेव्हा एका कामगाराची तिच्यावर नजर गेली. हृदय पिळवटून टाकणाऱ्या या घटनेची माहिती मिळताच कामोठे पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. डासांनी चावे घेतल्याने या बाळाचे अवघे शरीर सुजले होते. कामोठे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक नाईक यांच्या सूचनेनुसार घटनास्थळी दाखल झालेल्या पोलीस उपनिरीक्षक विक्रम साळुंके यांनी तातडीने त्या बाळाला कळंबोली येथील एमजीएम रुग्णालयात दाखल केले. येथील बालरोगतज्ज्ञांच्या पथकांनी शर्तीचे प्रयत्न करून या बाळाला वाचवले.
सुरुवातीचे दीड दिवस संसर्गापासून वाचवण्यासाठी काचेच्या पेटीत ठेवण्यात आलेल्या या बाळाला शनिवारी सुखरूपपणे बाह्य़रुग्ण विभागात उपचारासाठी दाखल करण्यात आले. तिच्या आईवडिलांचा पत्ता लागत नसल्याने सध्या एमजीएमचे कर्मचारी आणि कामोठे पोलीसच तिचे पालक बनले आहेत. या बाळाचे नाव काय ठेवावे, असा प्रश्न एमजीएम रुग्णालयाच्या प्रशासनाला सूरुवातीला पडला होता. हे बाळ कामोठे पोलिसांनी आणल्यामुळे ‘बेबी ऑफ कामोठे पोलीस स्टेशन’ असे नाव या बाळाचे ठेवण्यात आले आहे. बाळाची देखभाल करण्यासाठी दोन महिला पोलिसांची नेमणूक करण्यात आली आहे. दर १२ तासांनी या कर्मचाऱ्यांच्या रूपात बाळाला नवी ‘आई’ लाभते. बाळाला दूध पाजण्याचे, तिचे कपडे बदलण्याचे तसेच औषध देण्याची जबाबदारी रुग्णालयाच्या परिचारिका आणि या महिला पोलीस अगदी मायेने करत आहेत. एमजीएम रुग्णालयाने या बाळावर केलेल्या उपचाराचा कोणताही खर्च घेतला नसल्याचे पोलिसांनी सांगितले. जणू या चिमुकलीने रुग्णालय आणि पोलिसांना लळाच लावला आहे. मुलगी असल्यामुळे या बाळाला कचऱ्यात फेकण्यात आले असावे, असा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. पोलीस उपनिरीक्षक विक्रम साळुंके यांचे पथक बाळाच्या पालकांचा शोध घेण्यासाठी आरोग्य विभागातील तज्ज्ञांची मदत घेऊन मागील पंधरवडय़ात तालुक्यात व नवी मुंबईतील जन्मणाऱ्या बाळांची यादी काढून त्यामार्फत तिच्या पालकांचा शोध घेत आहेत. तसेच कोणालाही याबद्दल माहिती असल्यास ९८२३९५९९३४ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.
बाळाचे घर पोलीस ठाण्यात
या बाळावर उपचार झाल्याने हे बाळ घरी घेऊन जाण्याचा सल्ला एमजीएम रुग्णालयाच्या डॉक्टरांनी पोलिसांना दिला. मात्र हे कुठे सुरक्षित ठेवावे असा पोलिसांना पडला आहे. बाल कल्याण समितीचे सदस्य (सीडब्ल्यूसी) हे संपूर्ण जिल्ह्य़ात आठवडय़ातून दोन दिवस उपलब्ध होत असल्याने दोन ते तीन दिवस या बाळाला पोलिसांना पोलीस ठाण्यातील पाळणाघरात ठेवावे लागणार आहे. के. एल. प्रसाद हे नवी मुंबईचे पोलीस आयुक्त असताना प्रत्येक पोलीस ठाण्यातील महिला कर्मचाऱ्यांसाठी ही पाळणाघरे बनविण्यात आली होती. हे बाळ कामोठे पोलीस ठाण्यातील याच पाळणाघरात महिला पोलीस कर्मचाऱ्यांसोबत ठेवावे लागणार आहे.