उरणमध्ये पोलिसांनी शनिवारी तीन संशयितांना ताब्यात घेतल्याचे वृत्त आहे. उरणच्या सागरी किनाऱ्यावर दहशतवाद्यांनी घुसखोरी केल्याच्या संशयावरून गेल्या दोन दिवसांपासून नौदलासह पोलीस व एनएसजीच्या कमांडोंकडून याठिकाणी कोम्बिंग ऑपरेशन सुरू आहे. त्यामुळे आता पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या संशयितांकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. येथील पनवेल-गव्हाण रोडनजीक असणाऱ्या गव्हाण गावातून पोलिसांनी या तीन संशयितांना ताब्यात घेतल्याचे समजते. त्यांच्याकडे लष्कराचे गणवेशही सापडल्याचे वृत्त आहे. त्यामुळे हे तीन संशयित दहशतवादी असल्याची शक्यता बळावली आहे. मात्र, याबाबत पोलीस किंवा संबंधित सुरक्षा यंत्रणांकडून अद्यापपर्यंत कोणताही अधिकृत खुलासा करण्यात आलेला नाही. सध्या पोलीस या संशयितांची कसून चौकशी करत आहेत.
उरणमध्ये गुरूवारी सकाळी दोन शाळकरी विद्यार्थ्यांना पाच जण संशयास्पदरित्या फिरताना आढळले होते. त्यांच्याकडे शस्त्रसाठा होता व ते हल्ला करण्यासंदर्भात बोलत होते, असे या विद्यार्थ्यांनी पोलिसांना सांगितल्यानंतर सर्वत्र खळबळ उडाली होती. उरीतील हल्ल्याच्या पाश्र्वभूमीवर सर्वच सुरक्षा यंत्रणांनी सतर्क होत, या पाचही संशयित दहशतवाद्यांच्या शोधासाठी मोहीम सुरू केली. गुरुवारपासून या संशयितांचा शोध सुरू होता. शुक्रवारी पोलीस व एनएसजी कमांडोंनी उरण परिसरातील शाळा, महाविद्यालये, बंद घरे, सागरकिनारे, किनारी परिसर पिंजून काढला. मात्र, कोणताही मागमूस लागला नाही. नौदलाने शुक्रवारी शोधमोहीम थांबवण्यात येत असल्याचे जाहीर केले. दरम्यान, या संशयित दहशतवाद्यांची रेखाचित्रे जारी करण्यात आली आहेत.
उरणमध्ये तीन संशयित पोलिसांच्या ताब्यात- सूत्र
दोन शाळकरी विद्यार्थ्यांना पाच जण संशयास्पदरित्या फिरताना आढळले होते.
Written by लोकसत्ता टीम
आणखी वाचा
First published on: 24-09-2016 at 17:42 IST
Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Police arrest three suspected terroirst in uran