नवी मुंबई मनपा विभाग कार्यालयात सर्वांच्या समक्ष मात्र त्यांच्या न कळत संगणक उघडून त्यातील प्रोसेसर चोरी करणाऱ्याला वाशी पोलिसांनी अटक केली आहे. त्याने आता पर्यंत कोपरखैरणे , वाशी विभाग कार्यालयात चोरी केली असून एका शाळेतही त्याने केलेली चोरी उघड झाली आहे. वाशी मनपा रुग्णालयात ही झालेली चोरी त्यानेच केली असावी असा संशय व्यक्त केला जात आहे.
अविनाश असे आरोपीचे नाव आहे. आरोपी हा संगणकाचे सुटे भाग चोरून त्याची विक्री करीत होता. त्याने गेल्या महिन्यात कोपरखैरणे विभाग कार्यालयात जाऊन दोन संगणकाचे सीपीयू उघडून त्यातील प्रोसेसर चोरी केले. ही चोरी केल्यावर तो दुसऱ्या माळ्यावर गेला व कर विभागातील एका संगणकाचे प्रोसेसर चोरी केले. या बाबत गुन्हा नोंद होऊन पंधराही दिवस उलटत नाही तोच त्याच कार्यालयात त्याने पुन्हा चोरी केली. याच दरम्यान वाशी विभाग कार्यालयातही त्याने असाच प्रकार केला. विशेष म्हणजे सर्व चोऱ्या कार्यालय सुरू असताना सर्वांच्या समक्ष त्याने केल्या. धक्कादायक बाब म्हणजे एकही कर्मचारी सुरक्षा रक्षक वा अधिकाऱ्याने हटकले नाही.
हेही वाचा: नवी मुंबई : हलक्या गाड्यांच्या वाहन चालकांचा असहकार; वाहतूक पोलीस हैराण
अशाच पद्धतीने त्याने वाशीतील एका इंग्रजी शाळेत चोरी केली होती. या चोरीचा तपास करीत असता सदर आरोपी वाशीत असल्याची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेश चव्हाण आणि गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक प्रमोद तोरडमल यांच्या मार्गदर्शनाखाली गेलेल्या पथकाने त्याला अटक केली.