लोकसत्ता टीम
पनवेल : डंपरच्या धडकेत कळंबोली वाहतूक शाखेचे पोलीस शिपाई ठार झाले आहेत. सुट्टी असल्यामुळे घऱाबाहेर पत्नीसोबत दुचाकीवर जात असताना हा अपघात शुक्रवारी सकाळी टेंभोडे गावाजवळ झाला. अरुण शामराव कर्ले असे या पोलीस शिपाईचे नाव असून ते पुढील वर्षी सेवानिवृत्त होणार होते.
आदई गावाच्या परिसरात राहणारे वाहतूक विभागाचे पोलीस शिपाई कर्ले यांना शुक्रवारी सुट्टी असल्याने ते पत्नीसोबत खरेदी करण्यासाठी टेंभोडे येथील पुलाखालून दुचाकीवरुन जात होते. शुक्रवारी सकाळपासून संततधार सूरु असल्याने रस्त्यावर अनेक ठिकाणी पाणी साचले आहे. या रस्त्यावरु जात असताना दुचाकीस्वारांना खड्डे व साचलेल्या पाण्याचा अंदाज येत नाही. टेंभोडे ते नवीन पनवेल या रस्त्यावरील पुलाजवळ वळसा घेणाऱ्या डंपरने कर्ले चालवीत असलेल्या दुचाकीला धडक दिल्याने हा अपघात झाला.
आणखी वाचा-नवी मुंबई: अवघ्या पंधरा मिनिटात दोन साखळी चोरी, २ लाख ४५ हजारांचा ऐवज चोरी
पोलीस शिपाई कर्ले यांच्या पत्नी दुचाकीच्या मागे बसल्या होत्या. त्याही या अपघातामध्ये जखमी झाल्या. दुचाकीला डंपरने ठोकर मारल्यानंतर कर्ले हे गंभीर जखमी झाले. त्यांना तत्काळ कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथील डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. पोलीस शिपाई कर्ले हे सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यातील फकीरवाडी येथील आहेत. कर्ले यांनी नवी मुंबई पोलीस दलात येण्यापूर्वी सैन्य दलातून स्वेच्छानिवृत्ती घेतली होती. पुढील वर्षी मे महिन्यात ते पोलीस दलातून सेवानिवृत्त होणार होते. कर्ले यांच्या पश्चात पत्नी व दोन मुले आहेत.