पनवेल : नवी मुंबई पोलीस दलातील एका पोलीस शिपायाने अंमली पदार्थ तस्करीतील एका आरोपीला पोलीस धाड कधी घालणार आहेत याची माहिती दिल्यामुळे नवी मुंबई पोलीस आयुक्तांनी संबंधित शिपायाला निलंबित केले आहे. बुधवारी रात्री याबाबतचे आदेश पोलीस आयुक्तांनी जाहीर केले. निलंबनाची कारवाई झालेल्या या पोलीस शिपायाचे नाव मुजीप नूरमोहम्मद सयद असे आहे. मुजीप हा रबाळे एमआयडीसी पोलीस ठाण्यात नेमणूकीस होता. नवी मुंबई पोलीस दलाचे सह पोलीस आयुक्त संजय येनपुरे यांच्या आदेशाने ही कारवाई करण्यात आली असून मागील वर्षी (४ डिसेंबर) अंमली पदार्थ विक्री करणा-यांची धरपकड संपुर्ण नवी मुंबईत सूरु होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> कृषी उत्पन्न बाजार समिती : शौचालय घोटाळा, एक माजी संचालक  अटक तर दुसऱ्याची चौकशी, एपीएमसीत खळबळ 

पोलीसांनी अनेक ठिकाणी धाडी टाकून अंमलीपदार्थ विक्रेते, तस्कर आणि अंमली पदार्थाचे सेवन करणाऱ्यांना ताब्यात घेतले. अशा एका प्रकरणातील संशयीत आरोपी दीपक कारंडेकर याच्याकडे मोठ्या प्रमाणात एम.डी. हा अंमलीपदार्थ असल्याची खात्रीलायक माहिती पोलीसांना मिळाल्यानंतर दीपक कारंडेकरला पकडण्यासाठी वाशी विभागाच्या पोलीस पथकाने सापळा रचला होता. पोलीस धाड घालून दीपकला पकडणार आहेत याची माहिती कारंडेकर समजल्याने तो सतर्क झाला. त्याने त्याच्याजवळील अंमली पदार्थाचा मोठा साठ्या एवजी कमी प्रमाणात एम.डी. हा अंमली पदार्थ स्वताकडे ठेवला. दीपकला धाडीची माहिती अगोदर कशी मिळाली याबाबत पोलीसांची चौकशी सूरु होती. दीपकला धाडीपूर्वी कोणी संपर्क साधला याची तांत्रिक माहिती पोलीसांनी मिळविल्यानंतर पोलीस शिपाई मुजीप सयद याचे नाव उजेडात आल्याने ही कारवाई करण्यात आली आहे. यापूर्वीही नवी मुंबई पोलीस दलाचे पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी गुन्हेगारांना मदत करणाऱ्या पोलीस कर्मचारी व अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई केली आहे. गुरुवारपासून मुजीप सयद याला कळंबोली येथील पोलीस मुख्यालयात हजेरी लावण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Police constable suspended for helping drug smuggler zws
Show comments