आगरी-कोळी समाजातील लग्न सोहळ्याच्या आदल्या दिवशी होणाऱ्या हळदी समारंभावर पोलिसांची करडी नजर असून दहानंतर डॉल्बीच्या दणदणाट करणाऱ्या वधू-वर मंडळीच्या नातेवाईकांना कोठडीची हवा खावी लागत आहे. त्यामुळे अलीकडे हळदी समारंभ करावेत की नाहीत या मानसिकतेपर्यंत आगरी-कोळी समाज आला आहे.
ठाणे आणि रायगड जिल्हय़ात सर्वाधिक असलेल्या आगरी-कोळी समाजात विवाहापूर्वी हळदी समारंभ मोठय़ा थाटामाटात पार पडतो. मांसाहार आणि मद्यपान हे या सोहळ्याचे प्रमुख स्वरूप आहे. काही वर्षांपासून त्याला ध्वनिवर्धक आणि डॉल्बीच्या दणदणाटाची साथ लाभली आहे. दणक्यात हळदी साजरी करणे हे या समाजात प्रतिष्ठेचे मानले जाते.
वधू-वरांना हळद लावण्याची औपचारिकता झाल्यानंतर बेफाम मद्यपान करण्यासाठी पाटर्य़ा झडतात. यात मांसाहाराचाही समावेश असतो. त्यानंतर मग नृत्याचा कार्यक्रम पार पडतो. हा कार्यक्रम याआधी पाच दिवस चालत होता. तो आता तीन दिवसांवर आला आहे.
सणसमारंभात ध्वनिप्रदूषणाची पातळी ओलांडण्यात चढाओढ करणाऱ्या मंडळांना आणि वाजंत्र्यांना आटोक्यात आणण्यासाठी थेट सर्वोच्च न्यायालयाने कारवाईचे आदेश दिले आहेत. त्यामुळे रात्री दहानंतर पोलिसांनी गस्त सुरू केली आहे. रुग्ण आणि विद्यार्थ्यांना परीक्षाकाळात त्रास होऊ नये यासाठी पोलिसांनी धडक कृती हाती घेतली आहे. पोलिसांनी रात्री दहानंतर अर्धा तासही खपवून न घेण्याचा निर्णय घेतला आहे. काही दिवसांपूर्वी सानपाडा येथे डॉल्बीचा दणदणाट बंद करण्यास गेलेल्या पोलिसांवर दारू पिऊन धांगडधिंगा करणाऱ्या तरुणांनी मटणाचा रस्सा फेकल्यानंतर प्रकरण चांगलेच चिघळले होते.
ग्रामस्थांच्या या कृतीमुळे पोलिसांनी वधू पक्षाच्या नातेवाईकांना रात्रभर पोलीस कोठडीत ठेवले होते. हाच प्रकार बेलापूर आणि करावे गावांत झाल्याने हळदीचे डॉल्बी बंद करण्यावर पोलिसांचा कटाक्ष आहे.
त्यामुळे हळदी समारंभात आता पहिल्यासारखी मजा राहिली नाही, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे. नवी मुंबई, उरण, पनवेल तालुक्यांतील सर्व गावांच्या चारही बाजूने नागरीकरण वाढल्याने ग्रामस्थांच्या या हळदी समारंभाशी काहीही देणेघेणे नसलेले नागरिक नियंत्रण कक्षाला त्वरित दूरध्वनी करून या दणदणाटाची तक्रार करीत असल्याचे एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.
आगरी-कोळी समाजानेही आता काळानुरूप बदलण्याची गरज आहे. ‘फोर्टी प्लस’ या संघटनेने याबाबत गावागावांत जाऊन प्रबोधन करण्यास सुरुवात केली आहे. अलीकडे लग्नाआधीच्या हळदी समारंभात मांसाहार आणि मद्यपान सोडून देण्याची विनंती प्रत्येकाला करण्यात येत आहे. पाच दिवसांवरून तीन दिवसांवर आलेला हा सोहळा आता नवीन पिढीमुळे एका दिवसात पूर्ण करण्याकडेही कल वाढू लागला आहे. या प्रथा अधिक चांगल्या आणि शांततेत पार पाडण्यासाठी व्यापक संपर्क मोहीम हाती घेण्यात येईल. नवी पिढी बदल स्वीकारण्यास तयार होईल, अशी आशा आहे.
– प्रदीप पाटील उर्फे मास्टर, अध्यक्ष, फोर्टी प्लस क्रिकेट संघ, नवी मुंबई</strong>