नवी मुंबई: गाडी चालवताना जर कोणी, गाडीतून धूर निघत आहे वा अन्य काही सांगितले तर सावधान रहा! असेच कारण सांगून दुरुस्तीच्या नावाखाली एका वाहन चालकाची तब्बल २९ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार घडला आहे. याबाबत रबाळे पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. 

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

यातील फिर्यादी मातीव कक्काडन हे भांडुप येथे राहत असून कोपरखैरणे येथे नोकरी करतात, तर त्यांची पत्नी महापे येथे नोकरी करते. आपल्या पत्नीला तिच्या नोकरीच्या ठिकाणी सोडून स्वतः नोकरी करत असलेल्या कार्यालयात ये-जा करणे हा नित्यक्रम आहे. ११ तारखेला त्यांना एका खाजगी कार्यक्रमासाठी बोरिवली येथे जायचे होते. त्यामुळे ते संध्याकाळी काम संपवून दोघेही बोरिवलीला जाण्यासाठी निघाले.

हेही वाचा… स्वातंत्र्यदिनी पनवेलकरांना तीन नवे आरोग्य केंद्रांची भेट

दिघा तलाव परिसरातून जात असताना एका व्यक्तीने त्यांना तुमच्या गाडीतून धूर येत असल्याचे सांगितले. त्यामुळे गाडी त्यांनी रस्त्याच्या कडेला घेत काय झाले हि पाहणी करीत होते. तेवढ्यात ज्याने गाडीतून धूर येत असल्याचे सांगितले ती व्यक्ती गाडी जवळ येत  एक गॅरेज असल्याचे सांगत गॅरेज वाल्यास घेऊन आला. गाडीची तपासणी केल्यावर दोघांनी मिळून गाडीचे काही भाग निकामी झाल्याचे सांगितले. त्यांनी सुटे भाग बदलले. दुरुस्ती खर्च म्हणून ऑनलाईन पैसे न घेतल्याने  २९ हजार रोख देण्यात आले. विशेष म्हणजे त्या व्यक्तीने स्वतःचा मोबाईल क्रमांकही  मातीव कक्काडन यांना दिला.  

हेही वाचा… ५ कोटी ४१ लाख रुपयांचा ऐवज पुन्हा मूळ मालकांच्या ताब्यात; ‘या’ गोष्टींचा समावेश

१२ तारखेला मातीव कक्काडन यांनी आपल्या नेहमीच्या गॅरेज चालकाकडे गाडी घेऊन गेले, व गाडीची तपासणी केली. त्यावेळी गाडी पूर्णपणे व्यवस्थित असून गाडीचे कुठलेही भाग बदलण्यात आलेले नाहीत असे सांगितले. ज्या व्यक्तीने आपला मोबाईल क्रमांक दिला त्याला फोन केला असता मोबाईल बंद असल्याचे समोर आले. त्यामुळे “त्या” दोन व्यक्तींनी आपली फसवणूक केल्याचे मातीव कक्काडन यांच्या लक्षात आले. या प्रकरणी मातीव कक्काडन यांनी रबाळे पोलीस ठाण्यात फसवणूक करणाऱ्या दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Police file case for cheating car driver of rs 29 thousand in navi mumbai dvr