द्रुतगती मार्गावर मार्गिकेची शिस्त मोडणाऱ्यांविरोधातील मोहिमेदरम्यान दुर्घटन

मुंबई- पुणे द्रुतगती मार्गावरील वाढत्या अपघातांना रोखण्याच्या उद्देशाने महामार्ग वाहतूक विभाग मार्गिकेची शिस्त मोडणाऱ्या वाहनचालकांवर दिवस-रात्र गुप्त पाळत ठेवण्यात येणार आहे. यासाठी एक मोहीम आखण्यात आली आहे. त्याची अंमलबजावणी करताना गुरुवारी सकाळी दोन पोलिसांना अपघात होऊन ते जखमी झाले. माडप बोगद्याजवळ हा अपघात झाला. विनीत पाटील व मिलिंद पाटील अशी जखमी पोलीस कर्मचाऱ्यांची नावे आहेत.

महामार्ग पोलीस विभागाचे अतिरिक्त पोलीस महासंचालक पद्मनाभन यांनी मार्गिकेची शिस्त मोडली जात असल्याने द्रुतगती मार्गावर अपघातांची संख्या जास्त असल्याचा निष्कर्ष काढला आहे. द्रुतगती मार्गावर कळंबोली ते खालापूर या पट्टय़ात वाहनचालकांना शिस्त लावण्यासाठी ११ सप्टेंबरपासून ही मोहीम हाती घेण्यात आली आहे. यासाठी पद्मनाभन हे खालापूर टोलनाक्यावर जातीनिशी हजर राहत आहेत. त्यामुळे बेशिस्त वाहनचालकांविरोधात कठोर कारवाई केली जात आहे.

या कारवाईत कळंबोली येथे काही खासगी वाहनांमध्ये पोलीस शिपाई प्रवासी म्हणून बसतात. याच वेळी मार्गिकेची शिस्त मोडणाऱ्या चालकांवर पाळत ठेवून वाहनाचा क्रमांक वहीत नोंदवून घेतला जात आहे. याच पद्धतीने ‘हेरगिरी’ करताना कळंबोलीतील विनीत पाटील आणि मिलिंद पाटील हे कर्मचारी प्रवास करताना गुरुवारी माडप बोगद्याजवळ टेम्पोला अपघात झाला. यात दोन्ही पोलीस कर्मचाऱ्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. शुक्रवारी ‘डिस्चार्ज’ देण्यात आला. मात्र वाहतूक पोलिसांच्या या मोहिमेमुळे वाहनचालकांना द्रुतगती मार्गावरील वेगमर्यादा आणि मार्गिका बदलणे भारी पडत आहे. अनेकदा वाहने दामटवताना आपल्याला कोणी पाहत नसल्याची किंवा पोलीस व प्रादेशिक परिवहन विभागाची (आरटीओ) जीप आल्याशिवाय वाहनचालक नियम पाळत नाहीत. पद्मनाभन यांची या वाहनचालकांवर नजर ठेवण्यासाठीची ही विशेष मोहीम वाहनचालकांमध्ये चर्चेचा विषय बनली आहे.

Story img Loader