नवी मुंबई : विनयभंगप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या अप्पर पोलीस आयुक्त निशिकांत मोरे यांचा जामीन अर्ज पनवेल न्यायालयाने गुरुवारी फेटाळला. त्यामुळे मोरे यांना फरार घोषित करण्यात आले आहे. त्याचा शोध पोलीस घेत आहेत. दरम्यान न्यायालय आवारात पीडित तरुणीच्या पालकांना धमकावल्याप्रकरणी दिनकर साळवी या पोलीस कर्मचाऱ्याविरोधात पनवेल पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. साळवी हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या ताफ्यातील वाहनाचा चालक आहे.
अप्पर आयुक्त निशिकांत मोरे यांच्याविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. मोरे यांनी अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात अर्ज केला होता. मंगळवार, ७ जानेवारी रोजी त्यावर सुनावणी होती, मात्र त्यावर गुरुवारी सुनावणी झाली. या सुनावणीत मोरे यांचा अर्ज फेटाळण्यात आला असून त्याचा पोलीस पथक त्यांचा शोध घेत असल्याची माहिती परिमंडळ दोनचे पोलीस उपायुक्त अशोक दुधे यांनी दिली. मंगळवारपासून पीडित तरुणी बेपत्ता आहे.