नवी मुंबई : पोलीस अधिकारी अश्विनी बिद्रे यांच्या रक्ताच्या नमुन्यांची पुन्हा चाचणी केली जाणार आहे. त्यासाठी आज (ता. २३) त्यांच्या मुलीच्या रक्ताचे नमुने घेतले असून ही चाचणी खासगी प्रयोगशाळेत केली जाणार आहे. घटनास्थळावरील सर्व वस्तूही या प्रयोगशाळेकडे देण्यात येणार आहेत.
पोलीस उपनिरीक्षक अश्विनी बिद्रे यांची ११ एप्रिल २०१६ रोजी हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी पोलीस निरीक्षक अभय कुरुंदकर याला अटक करण्यात आली होती, तर त्याचे अन्य साथीदारांनाही अटक करण्यात आली होती. यापूर्वी तपास अधिकारी पोलीस निरीक्षक संगीता अल्फान्सो यांनी हत्येसंबंधी ३९ वस्तू जप्त केल्या. त्याची न्यायवैद्यकीय चाचणी करण्यात आली. मात्र दरम्यान अल्फान्सो यांची बदली करण्यात आली. ही बदली वादग्रस्तही ठरली होती. दरम्यान ही चाचणी नकारात्मक (निगेटीव्ह) आली. मात्र त्यावेळी मुख्य आरोपी अभय कुरुंदकर हा अटकेत नव्हता. त्याने व त्याच्या भावाने प्रयोगशाळेच्या अहवालामध्ये फेरफार केला असल्याची शक्यता अश्विनीचे पती राजू गोरे यांनी व्यक्त केल्याने पुन्हा एकदा डीएनए चाचणी केली जाणार आहे.
आरोपींच्या जामीनावर आज सुनावणी
अश्विानी बिद्रे हत्या प्रकरणात आतापयर्र्त चार आरोपींना अटक करण्यात आले आहे. यात आरोपी क्रमांक तीन कुंदन भंडारी आणि आरोपी चार महेश फळणीकर यांनी न्यायालयात जामीन अर्ज केला होता. त्याची सुनावणी अलिबाग न्यायालयात गुरूवारी(ता.२५) होणार आहे.२० फेब्रुवारीला कुंदन आणि २६ फेब्रुवारीला महेश याला अटक करण्यात आली होती.
मुख्य आरोपी कुरुंदकर याने आपल्या भावाच्या मदतीने अहवालामध्ये फेरफार केला असण्याचा आमचा संशय आहे. आता पुन्हा आम्ही दिल्ली, बंगळूरू, मुंबई आणि अन्य ठिकाणी अथवा खासगी लॅबमध्ये चाचणी करावी, अशी विनंती केली होती. ती मान्य करण्यात आली आहे.
– राजू गोरे, फिर्यादी
फिर्यादीने संशय व्यक्त केल्याने डीएनए चाचणी पुन्हा करण्यात येणार असून ती फिर्यादीच्या मागणीनुसार खासगी प्रयोगशाळेकडून केली जाणार आहे.
-अजय कदम, साहाय्यक पोलीस आयुक्त