उरण : सरत्या वर्षाला निरोप आणि नववर्षाचे स्वागत करण्यासाठी तरुणाई सज्ज झाली असून उरणच्या पिरवाडी किनाऱ्यावरील हॉटेल तसेच उरण परिसरातील फार्महाऊस फुल्ल झाली आहेत. उरण परिसरात समुद्रकिनारा असला तरी किनाऱ्यावर राहण्याची सोय मर्यादित होती. नव्याने तयार झालेल्या हॉटेलामध्ये ही सुविधा उपलब्ध असून ही हॉटेल नववर्षाच्या स्वागतासाठी सज्ज झाली आहेत. स्वागतासाठी पोलिसांनी सतर्कतेचा इशारा दिला आहे. त्यासाठी पोलिसांचा कडक बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.
तरुणाईला थर्टी फर्स्ट साजरा करण्याचे वेध लागले आहे. त्यासाठी अनेक नियोजन आराखडे तयार करण्यात आले आहेत. हा आनंद साजरा करण्यासाठी तरुणाईत अनेक मनसुबे आखले जात आहेत. पार्ट्यासाठी ढाबे, फार्म हाऊस, हॉटेल बुकिंग करण्यासाठी तरुणाईत चांगलीच चढाओढ लागली आहे. दरम्यान नववर्षाचे स्वागत करताना अतिरेक होणार नाही याची नागरिकांनी दक्षता घेण्याचे आवाहन न्हावा-शेवा बंदर विभागाचे सहायक पोलीस आयुक्त धनाजी क्षीरसागर यांनी केले आहे.
हेही वाचा – नऊ महिन्यांत पनवेल महापालिकेची २२७ कोटी रुपयांची मालमत्ता करवसुली
मद्याप्राशन करून रस्त्याने गोंगाट करणे, नशेत वाहन चालवणे आदी बाबी टाळण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे. पिरवाडी, माणकेश्वर समुद्रकिनाऱ्यावर आणि सागरी परिसरातही चोख बंदोबस्तासाठी बीट मार्शल आणि ठिकठिकाणी पोलिसांची गस्ती पथके तैनात करण्यात आली आहेत. सरत्या वर्षाला निरोप आणि नववर्षाचे स्वागत करताना आयोजित कार्यक्रमासाठी पोलिसांकडून आवश्यक त्या परवानग्या घ्याव्या, असे आवाहनही उरण पोलिसांकडून करण्यात आले आहे. तसेच नववर्ष स्वागत करतानाच नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर मात्र गुन्हे दाखल करण्यात येतील, असा कडक इशाराही देण्यात आला आहे.
टेहळणी मनोरा सडला
उरणच्या पिरवाडी किनाऱ्यावरील पर्यटक आणि नागरिकांच्या सुरक्षेसाठी उभरण्यात आलेला मनोरा सडला आहे. या मनोऱ्यावरून टेहळणी करून नजर ठेवता येते. त्यासाठी सुरक्षारक्षकाची आवश्यकता आहे. मात्र त्याकडे प्रशासनाकडून दुर्लक्ष केले जात आहे.