पोलीस, उत्पादन शुल्क विभागाकडे ‘ब्रेथ अ‍ॅनलायझर’ यंत्रांची वानवा

३१ डिसेंबरला  मद्यपान करून वाहन चालवणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या निरीक्षकांनी आणि पनवेल परिसरातील विविध पोलीस ठाण्यांच्या प्रमुखांनी बारमालक व गृहनिर्माण सोसायटय़ांमधील आयोजकांना दिला असला, तरी मद्यपींना ओळखण्यासाठी त्यांच्याकडे ब्रेथ अ‍ॅनालायझर यंत्र नसल्याचे स्पष्ट झाले आहे. वाहतूक पोलिसांकडे ही यंत्रे आहेत, परंतु त्यापैकी अनेक यंत्रे बंद आहेत.

पनवेलमध्ये १४० हॉटेल व बार आहेत. शहर, खांदेश्वर, तालुका पोलीस ठाणे, कळंबोली, खारघर, तळोजा या विविध पोलीस ठाण्यांनी परिसरात नववर्षांचा जल्लोष करताना मद्यपान करण्यासाठी परवाना काढा असे आवाहन बैठका घेऊन केले आहे. मात्र मद्यपींना ओळखणार कसे हा जुनाच प्रश्न पोलिसांसमोर उभा आहे. स्थानिक पोलिसांनी अवैध मद्यपाटर्य़ावर छापा घातल्यास तेथे कारवाई करण्यासाठी ब्रेथ अ‍ॅनालायझर यंत्र पोलिसांच्या हाती नाही. त्यापेक्षा वाईट अवस्था राज्य उत्पादन शुल्क विभागाची आहे. या विभागाकडे आठच कर्मचारी आहेत. सोसायटीच्या पार्टीत मद्यपान करणार असल्यास परवाना काढावा, अन्यथा कारवाईला सामोरे जा, असा इशारा तीन दिवसांपूर्वीच दिला होता. परंतु अवैध मद्यसेवनावर नियंत्रण ठेवणाऱ्या या विभागाकडे एकही ब्रेथ अ‍ॅनालायझर नाही. त्यामुळे मद्यपींना कसे पकडावे, असा प्रश्न या विभागातील कर्मचाऱ्यांना पडला आहे. आमच्या विभागाकडे सध्यातरी मद्यपींना पकडण्यासाठी यंत्र नाही. असे यंत्र असल्यास कारवाई करणे सोयीचे होईल. रायगड जिल्ह्य़ातील कोणत्याही ठिकाणी राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे ही सोय नाही. तरीही विनापरवाना मद्यपाटर्य़ावर आमचे लक्ष आहे. मद्यपींच्या लक्षणावरून आम्ही त्याला ओळखतो. त्यानंतर संबंधित व्यक्तीची वैद्यकीय तपासणी केली जाते. मद्यपाटर्य़ाचे परवाने न घेता पाटर्य़ा सुरू असल्याचे समजल्यास विभाग नक्की कारवाई करेल, असे राज्य उत्पादन शुल्क विभाग निरीक्षक सुधीर पोकळे यांनी सांगितले.

पनवेल शहर वाहतूक विभागाकडे दोनच यंत्रे

पनवेल शहर वाहतूक विभागाकडे दोन यंत्रे आहेत. कळंबोली वाहतूक विभागाकडे असलेल्या दोन यंत्रांपैकी एक बंद आहे. खारघरमध्ये एक यंत्र आहे. मद्यपीला पकडल्यावर एका पोलिसाला पंचनामा करण्यापासून वैद्यकीय तपासणीला नेऊन दंड करेपर्यंत सुमारे सहा ते आठ तास घालवावे लागतात. त्यामुळे पोलीस या मद्यपींवर कारवाई करण्याचे टाळत असल्याची चर्चा आहे.

Story img Loader