नवी मुंबई: नवी मुंबई पोलीस आयुक्तालय हद्दीतील किल्ले गावठाण ते उरण आणि परिसरातील छोट्या गावालगत निर्जन स्थळी बेकायदेशीर राडा रोडा टाकण्याचे प्रमाणात प्रचंड वाढ झाली आहे. यावर सिडकोने कारवाई करण्याचा अनेकदा प्रयत्न केला मात्र राडा रोडा टाकणाऱ्या लोकांच्या दादागिरीने सिडको अधिकारीही हैराण झाल्याचे चित्र आहे. अखेर पोलिसांनी पुढाकार घेत १० डंपरवर कारवाई केली आहे. आता या मागच्या सुत्रधाराचा शोध पोलीस घेत आहेत.
नवी मुंबई, मुंबई ,पनवेल, उरण परिसरात मोठ्या प्रमाणात विकासकामे व पुनर्निर्माणाचे काम सुरू आहे. यातून निघणार राडा रोडा कुठे टाकावा असा प्रश्न आहे. त्यात नियमाप्रमाणे त्याची विल्लेवाट लावायची असल्यास खर्च येत असल्याने तो राडा रोडा कुठेही गुपचूप टाकला जातो. अशाच लोकांवर एनआरआय पोलिसांनी कारवाई केली असून यात १० डंपर जप्त केले आहेत. वहाळ समोरील रस्त्याचे बाजुला असलेल्या सिडको प्रशासनाच्या मोकळ्या जागेत काही वाहनामधुन अनाधिकृत राडा रोडा , माती व दगड असे मानवी आरोग्यास धोकादायक असलेला घटक टाकत आसल्याबाबत माहिती होती. शुक्रवारी साई मंदीर वहाळ समोरील रस्त्याचे बाजुला असलेल्या सिडको प्रशासनाच्या मोकळ्या जागेत अनाधिकृत डेब्रीज टाकण्याच्या तयारीत होते. तातडीने पथक पाठवून त्यांना ताब्यात घेतले.
आणखी वाचा- दूषित पाण्याने नागरिक हैराण, कोपरखैरणे परिसरात दुर्गंधयुक्त गढूळ पाण्याचा पुरवठा
या प्रकरणी सज्जाद अल्लाबख्श सययद, अय्युब हफिदउल्ला ,खान, रिझवान शेखू अहमद, आदीब शेख, अशोक अक्ष्मण लांडगे, रामप्रेम चव्हाण ,अफरोज मोईन खान, तुलसी पुरण माहतो, राहुल रामविलास यादव,रामचंद्र राजाराम वर्मा, या वाहन चालकांना ताब्यात घेतले आहे. वरील आरोपी यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी मुबारक, शकिल, माऊली, अमित खारकर, विकी दापोलकर व इतर काहींनी सांगितल्या प्रमाणे राडारोडा टाकण्यासाठी आलो होतो अशी माहिती पुढे आली आहे. ही कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद तोरडमल यांचे मार्गदर्शनाखाली एनआरआय पोलीस ठाणेचे पोलीस उपनिरीक्षक राहुल गरड व पथकाने केली आहे. अशी माहिती पोलीस उपायुक्त विवेक पानसरे यांनी दिली.