नवी मुंबई – नवी मुंबईत नववर्षाच्या पहाटे पोलीस हवालदार विजय चव्हाण (४२) यांची दोन मारेकर्यांनी गळा दाबून हत्या केली. चव्हाण यांचा मृत्यु लोकल अपघातात झाला हे भासवण्यासाठी मारेकर्यांनी त्यांचा मृतदेह ट्रान्स हार्बर मार्गावरील रबाळे आणि घणसोली रेल्वे स्थानकांच्या दरम्यान लोकलपुढे रेल्वे रुळांवर फेकला. मात्र मोटारमनच्या सर्तकर्तमुळे त्यांचा हा बनाव फसला. याप्रकरणी वाशी रेल्वे पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून ते मारेकर्यांचा कसून शोध घेत आहेत.
पनवेल रेल्वे पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले विजय चव्हाण हे घणसोली येथे राहत होते. मंगळवारी ३१ डिसेंबर रोजी चव्हाण यांची साप्ताहिक सुट्टी होती. त्याच रात्री मारेकर्यांनी त्यांची गळा आवळून हत्या केली. चव्हाण यांचा अपघातात मृत्यू झाला हे भासवण्यासाठी दोन्ही मारेकरी बुधवारी पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास त्यांचा मृतदेह रबाळे रेल्वे स्थानक परिसरात घेऊन आले. ठाणे-पनवेल ही लोकल रबाळे रेल्वे स्थानकातून पुढे घणसोलीच्या दिशेने निघाल्यानंतर मारेकर्यांनी चव्हाण यांचा मृतदेह रेल्वे रुळावर फेकून पलायन केले. लोकल अत्यंत जवळ आल्यानंतर मारेकर्यांनी केलेले हे कृत्य मोटरमनच्या निदर्शनास आले. मोटरमनने या घटनेची माहिती आरपीएफ जवान आणि वाशी रेल्वे पोलिसांना दिली. त्यानंतर रेल्वे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन चव्हाण यांचा मृतदेह ताब्यात घेतला आणि पुढील तपास सुरू केला.
हेही वाचा >>>उरणच्या हवेचा गुणवत्ता निर्देशांक वर्षभर १५० पार
गळा दाबल्याच्या खुणा
याप्रकरणी अधिक चौकशी केली असता मृत झालेली व्यक्ती ही पनवेल रेल्वे पोलीस ठाण्यातील पोलीस शिपाई विजय चव्हाण असल्याचे उघडकीस आले. त्यांच्या गळ्यावर दाबल्याच्या खुणा आढळून आल्या. त्यांची गळा दाबून हत्या केली असावी असा प्राथमिक अंदाज आहे
हे कृत्य करणाऱ्यांना पकडण्यासाठी वाशी रेल्वे पोलिसांनी वेगवेगळी पथके तयार केली आहेत. अशी माहिती वाशी रेल्वे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेश शिंदे यांनी दिली आहे.