गणशोत्सवानिमित्त शुभेच्छांचा ‘वर्षांव’
पाच दिवसांपूर्वी विघ्नहर्त्यां गणरायचे आगमन झाले असून राजकीय फलकबाजी शहरात वाढताना दिसत आहे. गणेशभक्तांना शुभेच्छा देण्याची चढाओढच लागल्याचे दिसत आहे. विधानसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर ही फलकबाजी वाढली आहे.
गणेश मंडळाबाहेर हे प्रमाण वाढले असून काही मोक्याच्या ठिकाणीही फलक झळकू लागले आहेत. गणेशोत्सवाचा आधार घेत प्रभागात राजकीय वर्चस्व ठेवण्यासाठी हा प्रकार सुरू असल्याचीही चर्चा आहे. उच्च न्यायलयाने बेकायदा फलक लाऊन शहर विद्रुप करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले असतानाही ही बेकायदा फलकबाजी सुरू आहे. फलक लावताना पालिकेची परवानगी आवश्यक आहे. तशी परवानगी न घेतल्यास संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश पालिकेला आहेत. मात्र शहरात चौक, मैदान, उद्यानालगत असे बेकायदा फलक लावलेले दिसत आहेत. पालिकेकडून प्रत्येक विभाग कार्यालय स्तरावर शहरात फलक लावण्यासाठी परवानगी दिली जाते. गणेशोत्सव काळात मंडळांना कमानीसाठी परवानगी दिली जाते. तर इतर फलकांना फक्त तीन दिवसांची परवानगी दिली जाते. असे असताना अनेक दिवसांपासून फलक लावलेले दिसत आहेत.
कोपरखरणेत नऊ फलकांनाच परवानगी
कोपरखैरणे विभागात अवघ्या नऊ फलकांसाठी परवानगी घेतली असून या ठिकाणी असंख्य फलक दिसत आहेत. हिच परिस्थिती इतर विभागातही आहे. या संदर्भात सहाय्यक आयुक्त अशोक मढवी यांना विचारले असता, महापालिकेडून फलकांकरीता तीन दिवसांची परवानगी दिली जाते. तसेच बेकायदा फलकांवर कारवाईदेखील करण्यात येत आहे. तसे आढळल्यास गुन्हा दाखल करण्यात येईल.