नवी मुंबई: नवी मुंबई शहरातील औद्योगिक पट्यालगत असलेल्या विभागांना अजून ही प्रदूषित वातावरणाचा त्रास सहन करावा लागत आहे. विशेषतः वाशी-कोपरखैरणेच्या वेशीवर प्रदूषण कायम आहे. नवी मुंबई महाराष्ट्र प्रदूषण मंडळाने कारवाई करून देखील नागरिकांना मोकळा श्वास घेण्यास अडचणी येत आहेत. अद्यापही वाशी-कोपरखैरणे दरम्यान रात्रीच्या वेळी अंधाराचा गैरफायदा घेत रासायनिक मिश्रित वायू हवेत उत्सर्जित केला जात आहे. या आठवडाभरापासून सार्वजनिक सुट्ट्यांची संधी साधून प्रदूषण केले जात आहे. ऐन रात्री रासायनिक मिश्रित दूषित धूर हवेत सोडला जात असून रहिवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
नवी मुंबई शहरात आता वायू प्रदुषण नित्याचेच झाले आहे. मे महिन्यानंतर थोड्याशा कलावधी करिता का होईना नागरिकांची यातून सुटका झाली होती. मात्र आता पावसाने दडी मारली असून सार्वजनिक सुट्ट्यांच्या आडून शहरातील काही विभागात पुन्हा प्रदूषित वातावरण होत आहे. ३० ऑगस्टपासून वाशी आणि कोपरखैरणे परिसरात रात्री १२ पासून ते पहाटे ३.३०पर्यंत मोठ्या प्रमाणात धुरकट वातावरण निदर्शनास येत आहे. त्याच बरोबर यादरम्यान येशील रहिवाशांना श्वास घेण्यास त्रास देखील होत असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत.
हेही वाचा… कथित पत्रकाराच्या विरोधात खंडणीचा गुन्हा दाखल… आणि हे गुडलक काय आहे? वाचा नेमके काय प्रकरण आहे…
मंगळवारी रात्री साडेबारा ते दोन दरम्यान महापे ते कोपरी या संपूर्ण पट्ट्यात मोठ्या प्रमाणात वायू प्रदूषण झाले होते. तसेच शनिवारी पुन्हा रात्री १२ ते पहाटे ३.३०पर्यंत हवेत मोठया प्रमाणात धुके पसरले होते. याची तीव्रता इतकी होती की अगदी हाकेच्या अंतरावरील व्यक्ती स्पष्ट दिसत नव्हती. तसेच उत्सर्जित होणाऱ्या प्रदूषित वायूच्या दर्प वासामुळे नागरिकांना मळमळ,श्वास घेण्यास त्रास होत होता.
हेही वाचा… ठाणे, नवी मुंबईत नव्या पोलीस ठाण्यांच्या निर्मितीला वेग; जागेसाठी हालचाली सुरू
शनिवारी रात्री कोपरीपाडा- वाशी येथील हवा गुणवत्ता निर्देशांक ३०१ एक्युआय म्हणजेच अतिखराब दर्शविला होता. यामध्ये प्रमुख प्रदूषक ओझोन असल्याची नोंद होती. अशी प्रदूषित हवा खुप काळ राहिल्यास श्वसनासंबंधित आजार बळवतात. तेच कोपरखैरणे येथील हवा गुणवत्ता निर्देशांक ८३ एक्युआय तर नेरुळचे ४७ एक्युआय होता. महाराष्ट्र प्रदूषण मंडळाकडून प्रदूषण करणाऱ्या संबंधित कंपन्यांना कारणे दाखवा नोटीस, बंदची नोटीस पाठवून देखील शहरात अजून ही प्रदूषणाचा विळखा कायम आहे. त्यामुळे महाराष्ट्र प्रदूषण मंडळाने याकडे गांभीर्याने पाहणे गरजेचे झाले असून कुठेतरी याची चाचपणी व्हायला पाहिजे अशी मागणी नागरिकांमधून व्यक्त होत आहे.
महाराष्ट्र प्रदूषण मंडळाकडून तुटपुंज्या कारवाई सुरू असून नुसते कागदीघोडे नाचविले जात आहेत. यावर कोणतीही ठोस उपाययोजना होताना दिसत नाही. पावसाळा आणि हिवाळ्यात रात्री हवेचा दाब जास्त असतो, अशावेळी सर्व हवा प्रदूषण नागरिवस्तीमध्ये पसरते. यादरम्यान अशा कंपन्याना सायंकाळी ५ नंतर कोणत्याही प्रकारची रासायनिक मिश्रित हवा उत्सर्जित करू नका अशा सूचना दिल्या पाहिजेत. मात्र तक्रारी करून देखील उपाययोजना होताना दिसत नाहीत. त्यामुळे याबाबत आता केंद्राकडे तक्रार करणार आहे. केंद्राने यामध्ये लक्ष घालावे. याबाबत केंद्रीय पातळीवर बैठक सुरू करणार आहोत. – संकेत डोके, अध्यक्ष, नवी मुंबई विकास प्रतिष्ठान.
रात्रीची हवा गुणवत्ता
निर्देशांक (एक्युआय)
कोपरीपाडा-वाशी
नेरुळ
कोपरखैरणे
शनिवार
३०१
४७
८३
रविवार
८९
८७
१०५