गणेशोत्सवात सजावटीसाठी वापरण्यात येणाऱ्या थर्माकोलमुळे खाडीकिनारा प्रदूषित होत असल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे मासेमारी तसेच शेतीवर विपरीत परिणाम होण्याची शक्यता असल्याने थर्माकोलच्या मखरांची योग्य ठिकाणी विल्हेवाट लावण्याची मागणी निसर्गप्रेमी व पर्यावरणवादी करीत आहेत. श्री गणेशासाठीच्या मखरामध्ये विघटन न होणाऱ्या तसेच पर्यावरणाला हानीकारक असलेल्या थर्माकोलची आरास मोठय़ा प्रमाणात केली जाते. थर्माकोल हे सहज उपलब्ध होणारे, तुलनेने स्वस्त व सजावटीसाठी सोपे असल्याने त्याचा अधिक वापर होतो. मात्र ते पर्यावरणासाठी घातक असल्याने त्याचा वापर टाळण्याचे आवाहन वारंवार केले जाते. त्याला पर्याय म्हणून कागद, कापडी फलक किंवा फुले-झाडे, पुठ्ठा आदीचा वापर काही जण करतात. मात्र हे प्रमाण अत्यल्प आहे. ही मखरे सहज उपलब्ध होत नसल्याने इच्छा असूनही निसर्गस्नेही मखर मिळत नसल्याची खंत विलास गावंड यांनी व्यक्त केली. तर, यंदा बांबू तसेच कागदापासून तयार केलेल्या मखरांचे प्रदर्शन व विक्री उरणमध्ये ठेवण्यात आली होती. त्याला उत्तम प्रतिसाद मिळाल्याची माहिती मखर निर्माते बाळू वाजेकर यांनी दिली. या मखरांची पुढील वर्षांसाठीची नोंदणीही सुरू झाल्याचे त्यांनी सांगितले. मात्र उरणमधील खेडय़ांत समुद्रालगत असलेल्या गावांच्या खाडय़ांत थर्माकोलच्या मखरांचे मोठय़ा प्रमाणात विसर्जन केले जात असल्याने खाडीतील मासळी व अन्य जलचरांवर याचा परिणाम होत असल्याकडे निनाद ठाकूर यांनी लक्ष्य वेधले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा