वातावरणातील बदलामुळे मासळीच्या दरात वाढ
उरण : चिकन, मटण महाग झाले असतानाच वादळी वाऱ्यामुळे समुद्रातील मासे मिळण्याचे प्रमाण कमी झाल्याने मासळीचे दरही वाढले आहेत. ३० ते ४० टक्के दरवाढ झाली असून पापलेट, सुरमई २०० रुपयांनी तर हलवा १०० रुपयांनी महागला आहे.
पावसाळ्यानंतरचा मासळीचा हंगाम हा मासेमारांसाठी महत्त्वाचा असतो, या कालावधीत माशांचे प्रमाण वाढते. परंतु यावर्षी गेल्या दोन महिन्यांपासून खोल समुद्रात मिळणाऱ्या मासळीचे प्रमाणच कमी झाले आहे. याचे मुख्य कारण म्हणजे सध्या वातावरणात होणारे बदल हे आहेत. वादळी वाऱ्यामुळे समुद्रातील मासळी सापडत नाही. याचा परिणाम सर्व सामान्यांचे खाद्य असलेल्या बोंबील, मांदेली,
वाकटय़ा यांच्यासह मोठय़ा मासळीचेही दर वाढले आहे. बोंबील माशाचा हंगाम नसल्याने बोंबलाचीही आवक घटली आहे. बांगडय़ांचा हंगाम सुरू असला तरी चांगल्या प्रतीचा माल येत नाही.
मच्छीमारांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न
यामुळे मासेमारी व्यवसायावर अवलंबून असलेल्या मच्छीमारांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न उभा राहिला आहे. नेहमी मिळणारी मासळी सध्या मिळेनाशी झाली आहे. त्यामुळे मासळी बाजार ओस पडू लागली आहेत. उत्पन्नाचे मुख्य साधन असलेल्या या मासळीपासूनही मासेमारांना वंचित राहावे लागत असल्याची माहिती करंजा येथील मच्छीमार विनायक पाटील यांनी दिली.
३० ते ४० टक्के दरवाढ (रुपयांमध्ये)
बांगडा : १३० वरून १७५.
सरंगा: ६०० वरून ८००.
कोळंबी : १५० वरून २५०.
पापलेट : ८०० वरून १०००.
सुरमई : २५० वरून ४५०.
हलवा : ३०० वरून ४००.
माकोल : २५० वरून ३३०.
छोटी कोळंबी : १२०.
मांदेली : १००.
बोंबिल : १००.
कलेट रावस : ३५०.
शिंगाळा : १२५.
पावसाळ्याच्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा मासळीचा हंगाम सुरू झाला असला तरी समुद्रातील वादळी वाऱ्यांचा मासेमारीवर परिणाम झाला आहे. मासळीची आवक कमी झाली आहे.
– सुमन कोळी, मासळी विक्रेती,