मुंबई कृषी उत्पन्न कांदा-बटाटा बाजार समितीत दिवाळी सणानिमित्ताने आवक घटली असून दरात वाढ झाली आहे. मागील आठवड्यात प्रतिकिलो २० ते २५ रुपयांनी उपलब्ध असलेला कांदा वधारला असून आता २२ ते २८रुपयांनी विक्री होत आहे. पुढील कालावधीत कांद्याची दरवाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. वाशीच्या एपीएमसी घाऊक बाजारात कांद्याच्या बाजारभावात पुन्हा वाढ झालेली आहे. गेल्या काही महिन्यांपासून कांद्याचे दर १२ते १५ रुपयांवर स्थिर होते.

हेही वाचा : नवी मुंबई: वारंवार हॉर्न वाजवला म्हणून दुचाकीस्वाराला जबर मारहाण

मात्र गणेशोत्सव कालावधीत मुसळधार पावसाने चाळीतील साठवणुकीचा कांदा भिजल्याने मोठ्या प्रमाणावर खराब झाला असून त्याचबरोबर नवीन लाल कांद्याच्या उत्पादनाला ही फटका बसला आहे. त्यामुळे कांदा महागला आहे.आता दिवाळी निमित्ताने सुट्टीत कांदा काढणीसाठी आणि शेतमाल भरण्यासाठी कामगार उपलब्ध नसल्याने बाजारात कांद्याची आवक निम्म्यावर आली असून मागणीत ही वाढ झाल्याने दरवाढ झाली आहे, अशी माहिती व्यापारी मनोहर तोतलानी यांनी दिली आहे. बाजारात नित्यनेमाने कांद्याच्या ९०-१०० गाड्या दाखल होत असतात,परंतु आज गुरुवारी बाजारात केवळ ४५ गाड्यांची आवक झाली आहे. किरकोळ बाजारात कांद्याने चाळीस रुपयांचा दर गाठला आहे.

Story img Loader