गेले वर्षभर कांदापेक्षा ही बटाट्याचे दर वरचढ ठरत होते. परंतू बाजारात आता नवीन बटाटा दाखल होण्यास सुरुवात झाली आहे. नवीन बटाटा मोठ्या प्रमाणावर दाखल होत असून दरात ५ रुपयांची घसरण झाली आहे. प्रतिकिलो १६ ते १७ सतरा रुपयांनी उपलब्ध असलेले बटाटे आता १२ ते १३ रुपयांनी विक्री होत आहेत.
हेही वाचा- नवी मुंबई कचरामुक्त शहर नाहीच; आजही रस्त्यावर कचऱ्याचे ढीग
यंदा सुरुवातीला पाऊस लांबल्याने बटाट्याची लागवड उशिरा करण्यात आली. त्यामुळे नवीन बटाटा दाखल होण्यास विलंब झाला आहे. त्यामुळे यावर्षी कांद्यापेक्षाही बटाट्याचे दर अधिक होते. अवकाळी पावसाने जुना बटाटा खराब झाल्याने मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी होत होता त्यामुळे दर वधारले होते. परंतु बाजारात आता नवीन बटाटा दाखल होत आहे. बाजारात उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश महाराष्ट्रमधून मोठ्या प्रमाणात बटाटा दाखल होतो. एपीएमसीत शुक्रवारी बटाट्याच्या ६८ गाड्या दाखल झाल्या असून दरात घसरण झाली आहे. पुढील कालावधीत दर आणखीन कमी होण्याची शक्यता आहे, असे मत व्यापाऱ्यांनी व्यक्त केले.