सिडकोच्या सागरी(कोस्टल)मार्गाच्या दुरावस्थेचे वृत्त लोकसत्ता मध्ये प्रसिद्ध झाले होते. त्यानंतर सिडकोने तातडीने भर पावसात या मार्गावरील खड्डे भरण्याचे काम केले. मात्र आठ दिवसानंतर पुन्हा एकदा या महामार्गावरील खड्डे जैसे थे स्थितीत असल्याने प्रवासी व वाहनचलकांकडून संताप व्यक्त केला जात आहे. त्याचप्रमाणे खड्डे भरले की मलमपट्टी केली असाही सवाल केला जात आहे. या मार्गावरील खड्डे बुजविसाठी वापरण्यात आलेली खडी उखडून पुन्हा एकदा त्याच ठिकाणी खड्डे पडू लागले आहेत. तर अनेक ठिकाणी या रस्त्यावर खडीचे उंचवटे निर्माण झाल्याने वाहनांना खड्डे आणि उंचवटे यांचा सामना करीत धोकादायक स्थितीत वाहन हकावे लागत आहे.
हेही वाचा >>> नवी मुंबई: मद्य पिण्यास पैसे दिले नाही म्हणून दोघांनी केली मारहाण
उरण ते जेएनपीटी पळस्पे व बेलापूर या दोन्ही राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३४८ व ३४८ (अ) यांना जोडणारा सिडकोचा खोपटे पूल ते पंजाब गोदाम हा अडीच किलोमीटर लांबीचा सागरी महामार्ग प्रवासी वाहतुकीसाठी महत्वाचा आहे. या मार्गामुळे कमी वेळात विना अडथळा मुंबई, पनवेल आणि नवी मुंबईचे अंतर पार करता येत आहे. त्यामुळे उरण मधील खाजगी वाहनचलक व दुचाकीस्वार या मार्गाचा वापर करीत आहेत. त्याचप्रमाणे द्रोणागिरी नोड व खोपटे,कोप्रोली या परिसरातील गोदामात मालाची ने आण करणारी कंटनेर वाहने ही याच मार्गाने येत आहेत. कमी अंतरामुळे या मार्गाला प्राधान्य दिले जात आहे. मात्र मागील काही महिन्यांपासून या मार्गावर पडलेल्या खड्ड्यामुळे नागरीकांना त्रास सहन करावा लागत आहे. मार्गाच्या दुरुस्ती साठी सिडको ने साडेतीन कोटींची निविदा काढली आहे. त्यामुळे या मार्गाची लवकरात लवकर कायमस्वरूपी दुरुस्ती करण्याची मागणी येथील प्रवासी व नागरीकांनी केली आहे.