लोकसत्ता प्रतिनिधी
नवी मुंबई : नवी मुंबईत अनेक ठिकाणी मनपाची अनावश्यक काम सुरू असल्याची ओरड आता सामान्य बाब झाली आहे. मात्र अशी कामे करत असताना दर्जाही राखला जात नसल्याचे समोर आले आहे. कोपरखैरणे सेक्टर १५-१६ येथे काही महिन्यापूर्वी नव्याने पदपथ दुरुस्ती करण्यात आली. मात्र त्यावर पेव्हर ब्लॉक टाकण्यापूर्वीच त्याला मोठमोठी छिद्र पडणे सुरु झाले आहे. त्यामुळे पेव्हर ब्लॉक टाकण्यासाठी टाकण्यात आलेल्या स्लॅबचा दर्जा निकृष्ट असल्याचे दिसून येत आहे.
कोपरखैराणे भागातील सेक्टर १५ चा नाका म्हणून ओळखला जाणारा भाग हा मिनी मार्केट सारखा आहे. या ठिकाणी भाजी मंडई असून मोठ्या प्रमाणावर अनधिकृत फेरीवाल्यांचे साम्राज्य पसरले आहे. जुलैच्या आसपास याच ठिकाणी सुस्थितीत असलेले पदपथ उखडून त्यावर स्लॅब टाकण्यात आला. स्लॅब टाकल्यावर त्यावर पेव्हर ब्लॉक वा टाकण्यात येणार असल्याची माहिती संबंधित विभागाने दिली होती. मात्र अद्याप या ठिकाणी पेव्हर ब्लॉक टाकणे वा स्लॅबवर अन्य काही रंगरंगोटी सुशोभीकरण न करता आहे तसेच ठेवण्यात आले. परिणामी त्यावरच अनधिकृत फेरीवाल्यांनी पुन्हा बस्तान बसवले.
आणखी वाचा-उरण : मोरा सागरी पोलीस ठाण्याचे काम निधीअभावी अपूर्णच
या ठिकाणच्या पदपथावर पावभाजीपासून कबाब, अंडा-भुर्जी, आईस्क्रीम, भेळ आदी पदार्थांचे गाडे असून हॉटेलप्रमाणे जेवणही मिळते. विशेष म्हणजे हे सर्व रात्री सातनंतर सुरू होते. गाडे लावताना टेकू देणे, छत्रीसाठी स्लॅबला छिद्र पाडणे, सुरू झाले. सध्या या पूर्ण भागावर तेलाची पुटे चढली असून दिवसा चालताना पायही घसरून पादचारी पडल्याच्या घटना घडत असतात अशी माहिती येथील दुकानदाराने दिली. याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना विचारणा करण्याचा प्रयत्न केला मात्र प्रतिसाद मिळाला नाही.
कोपरखैरणे सेक्टर १५-१६ मध्ये नुकतीच पदपथांची दुरुस्ती करण्यात आली असून यावर अद्याप पेव्हर ब्लॉक बसवायचे आहेत. परंतु, त्यापूर्वीच खड्डे पडल्याने कंत्राटदाराने केलेल्या कामाच्या दर्जाबाबत शंका व्यक्त केली जात आहे.