रस्त्यावर माती, खडीची मलमपट्टी; पदपथ वाहून गेले, वाहनचालकांचा जीव धोक्यात

नवी मुंबईतील औद्योगिक क्षेत्राला जोडणाऱ्या महापे ते शिळफाटा रस्ता खड्डय़ांनी खिळखिळा झाला आहे. महानगर विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) बांधलेल्या आणि राजकीय नेत्यांनी प्रतिष्ठेच्या केलेल्या उड्डाणपुलाला सध्या भलेमोठे भगदाड पडले असून त्यामुळे रस्त्यावरून प्रवास करणे जिकिरीचे झाले आहे.

मुंबई, पनवेल व ठाणे येथून कल्याण, डोंबिवली व बदलापूरला जाण्यासाठी महापे ते शिळफाटा हा रस्ता महत्त्वाचा आहे. या ठिकाणी दररोज ५० हजाराहून अधिक वाहनांची वाहतूक होते.

खासगी चारचाकी वाहनांसह, अवजड वाहनांचादेखील वावर या रस्त्यावर असतो. या तीन किलोमीटरच्या रस्त्यावर भले मोठे खड्डे पडले आहेत. तर काही ठिकाणी पादचारी मार्गच वाहून गेले आहेत. रस्त्यांच्या दुतर्फा असणारी झाडेदेखील गटारामध्ये गेली आहेत. तर विद्युत खांबांची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे.

महापेकडून येणारी वाहने तसेच अंतर्गत रस्त्यावरील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी एमएमआरडीएच्या माध्यमातून उड्डाण पूल बांधण्यात आला आहे. कोटय़वधी रुपये खर्चून बांधण्यात आलेल्या या पुलाचे उद्घाटन विद्यमान पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते वर्षभरापूर्वीच करण्यात आले. मात्र पहिल्याच पावसात एमएमआरडीएच्या कामाचे पितळ उघडे पडले आहे.

पुलाच्या दोन्ही दिशांना प्रवेशद्वारवरच अडीच फुटांपेक्षा मोठे खड्डे पडले आहेत. या खड्डय़ांमुळे दुचाकीचे अपघात होत आहेतच, पण यामुळे वाहतूक कोंडीची समस्याही निर्माण होत आहे. या रस्त्यावर सन २०१५ मध्ये १० व  सन २०१६ मध्ये सहा गंभीर अपघात झाले असून अनेक जण जखमी झाले आहेत.

रस्त्याला मातीचे ठिगळ

महापे शिळफाटा रस्ता व उड्डाण पूलाच्या या ठिकाणी भर पावसात खड्डे बुजवण्याचे काम सुरू आहे. संबंधित ठेकेदारांकडून केवळ माती आणि दगड वापरून मलमपट्टी करण्यात येत आहे. मात्र, पावसाचा जोर वाढला की ही मातीची भर वाहून जाते. राज्य महामार्ग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या रस्त्याला मातीचे ठिगळ लावण्यात येत असल्याने वाहनचालकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.

रबाळे, महापे, शिळफाटा या रस्त्यावरून ये-जा करणे म्हणजे अपघाताला निमंत्रण देण्यासारखे आहे. एखादा अपघात झाल्यास कोणत्याही प्रकारची व्यवस्था या ठिकाणी नाही. एमएमआरडीए जर करोडो रुपये उड्डाण पुलाकरिता खर्च करते. मात्र तरीही खड्डे पडल्याने आता बैलगाडीतून प्रवास करण्याशिवाय पर्याय नाही.

– अनिल कौशिक, वाहनचालक

महापे-शिळफाटा रस्त्यावरील मध्यवर्ती पुलाला खड्डे पडले आहेत. अडवली गावाजवळ पादचारी पुलाचे काम सुरू असल्याने होणारी वाहतूक कोंडी दूर करण्याबरोबरच एमएमआरडीएकडून खड्डे बुजवण्यात येतील.

– एम. कराडे, एमएमआरडीए अधिकारी

Story img Loader