उरण : चिर्ले ते दिघोडे मार्गावर कंटेनर वाहतुकीमुळे तीन ते चार फूट खोलीचे मोठमोठे खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांमुळे या मार्गावरून दररोज जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. जेएनपीटी बंदरावर आधारित अनेक गोदामे चिर्ले, दिघोडे, वैश्वी, जांभूळपाडा, दादरपाडा या गावांमध्ये आहेत. त्यामुळे हा परिसर कंटेनरच्या गोदामांचे गाव म्हणून ओळखला जात आहे.

या मार्गावरून दिवसरात्र हजारो कंटेनर वाहने ये-जा करीत आहेत. हा मार्ग रानसई धरणासाठी एमआयडीसीकडून तयार करण्यात आला होता. त्यानंतर सध्या हा मार्ग सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत आहे. हा दास्तान ते दिघोडे मार्ग होता. यातील दास्तान ते चिर्ले मार्गावर नव्याने उड्डाणपूल उभारण्यात आला आहे. तर चिर्ले ते दिघोडे मार्गावरील वाढत्या वाहनांमुळे प्रचंड खड्डे पडले आहेत. हे खड्डे बुजविण्याची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागाची आहे.

मार्गाच्या दुरुस्तीचा प्रस्ताव बासनात

या मार्गाच्या दुरुस्तीचा प्रस्ताव असून तो अनेक वर्षे बासनात गुंडाळला गेला आहे. याचा त्रास येथील नागरिकांना सहन करावा लागत आहे. चिर्ले ते दिघोडे मार्गावरून प्रवास करीत असताना धूळ, माती आणि खड्ड्यांचा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे या मार्गाची लवकरात लवकर दुरुस्ती करावी.- विवेक पाटील, नियमित प्रवासी

Story img Loader