पनवेल : करंजाडे वसाहतीमधील वीज पुरवठा सोमवारी दुपारी १२ वाजता खंडीत झाल्यानंतर रात्री नऊ वाजले तरी विजसेवा पुर्ववत न झाल्याने नागरीकांना तब्बल नऊ तासांहून अधिक काळ विजेविना काढावा लागला. मंगळवारी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचा वीज पुरवठा दुरुस्ती कारणास्तव बंद राहणार असल्याने मंगळवारच्या पाण्याचे नियोजन कसे करावे असा प्रश्न करंजाडेवासियांना पडला आहे.
करंजाडे वसाहतीमध्ये वीज महावितरण कंपनीचे तब्बल ३५ हजार वीज ग्राहक आहेत. सोमवारी दुपारी करंजाडे वसाहतीमध्ये अचानक विज पुरवठा बंद झाल्याने वीज ग्राहकांचे नियोजन फीसकटले. करंजाडे वसाहतीला येणारा वीज प्रवाह ओएनजीसी ते भिंगारी अशा वीजवाहिनीव्दारे आला आहे. याच वाहिनीमध्ये बिघाड झाला. नेमका बीघाड कुठे झाला याचा शोध लावण्यासाठी अनेक तास गेले. सायंकाळी उच्चदाबाच्या वीज वाहिनीला दोन ठिकाणी जोडणी द्यायचे काम सूरु होते. रात्री नऊ वाजेपर्यंत तरी हे काम पुर्ण झाले नव्हते. या दरम्यान मंगळवारी पाणी येणार नसल्याने घरात वीजच नसेल तर सोमवारी रात्री पाणी कसे भरुन ठेवणार याबाबत करंजाडेवासीय चिंतेत होते.
करंजाडेवासियांनी जगावे कसे असा प्रश्न निर्माण झाला आहे. विजेचा लपंडाव सातत्याने वसाहतीमध्ये सूरुच आहे. दिवसभर सोमवारी विज नव्हती आणि उद्या पाण्याचे नियोजन करा सांगतात. एमजेपी आणि महावितरण कंपनीत समन्वय अभावाचा फटका सामान्य नागरीकांना करावा लागणार आहे. चंद्रकांत गुजर, अध्यक्ष, करंजाडे नोड फ्लॅट ओनर्स वेल्फेअर असोशिएशन