पनवेल ः भारतीय जनता पक्षाने तीनवेळा विधानसभेची उमेदवारी देऊन सुद्धा पनवेलकरांसमोरील पाणी टंचाईचा प्रश्नासह इतर मूलभूत सुविधांचा प्रश्न कायम असल्याने प्रशांत ठाकूर यांना यावेळच्या निवडणूकीत मतदारांच्या रोषाचा सामना करावा लागणार आहे. याचा लाभ ठाकूर यांच्या विरोधी गटाच्या प्रतिस्पर्धी उमेदवार नकारार्थी प्रचारातून करता येईल, मात्र पनवेलकरांचे पाणी, आरोग्य व शिक्षणासह मालमत्ता कर, रस्त्यातील खड्डे आणि खंडीत विजेसारखे मूलभूत गरजेच्या समस्या कधी सुटणार हा प्रश्न पनवेलच्या मतदारांकडून विचारला जात आहे. 

सोमवारी सकाळी नवीन पनवेल वसाहतीमधील सेक्टर ८ येथील पुर्णिमा दीप या सोसायटीमध्ये राहणारे बबन विश्वकर्मा यांनी घरात पाणी नसल्याने घरासमोरील रस्त्यांच्या खड्यांमध्ये साचलेल्या खड्यातील पाण्यात जाऊन आंघोळ केली आणि त्याची ध्वनीचित्रफीत समाजमाध्यमांवर पसरवली. विश्वकर्मा हे शेतकरी कामगार पक्षाचे पदाधिकारी आहेत.

हेही वाचा…रस्त्यात टेम्पो पार्किंग जीवावर बेतले, अपघातात एक ठार 

त्यांना या ध्वनीचित्रफीती मागील कारण विचारल्यावर रस्त्यातील खड्यांमुळे घरासमोर तळ्याचे रुप आले आणि घरात आंघोळीसाठी मूबलक पाणी नसल्याने ही अवस्था पनवेलकरांवर आल्याने सरकारी यंत्रणेसह स्थानिक आमदारांना तीन वेळा संधी देऊन सुद्धा ही स्थिती बदलू न शकल्याने ही कृती केल्याचे विश्वकर्मा यांनी सांगीतले. पनवेल महापालिका क्षेत्रात अजूनही  सिडको मंडळाकडेच नवीन पनवेल, कळंबोली, खांदेश्वर, कामोठे, खारघर, तळोजा, नावडे, काळुंद्रे या वसाहतींना पाणी पुरवठा करण्याची जबाबदारी आहे. त्यामुळे महापालिका होऊन आठ वर्षे उलटली तरी पाण्याचा प्रश्न सिडको मंडळ आणि पनवेल महापालिका सोडवू शकली नाही. अशीच पाणीबाणी मागील दोन आठवड्यांपूर्वी खारघर येथील सिडकोने बांधलेल्या स्वप्नपूर्ती गृहसंकुलातील रहिवाशांनी अनुभवली. सिडको मंडळ पाणी प्रश्न न सोडवू शकल्याने रहिवाशांना टॅंकरचे पाणी लाखो रुपये खर्च करुन खरेदी करावे लागते.

हेही वाचा…संदीप नाईक यांचे ‘एकला चालो रे’, समर्थकांना हवी तुतारी… नवी मुंबईतील बंडाची दिशा आज ठरणार ?

अनेक गृहनिर्माण सोसायट्यांनी बोअरवेल सुद्धा खणल्या आहेत. अजून किती वर्षात हा पाणी प्रश्न सुटेल, याचे ठाम उत्तर अद्याप पनवेल महापालिका, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, सिडको मंडळ या प्रशासनाचे प्रशासक पनवेलकरांना देऊ शकले नाहीत. पिण्याचे पाणीच अपुरे असल्याने इतर पायाभूत सुविधांची सुद्धा बोंब पनवेलमध्ये आहे.   पनवेल महापालिका डांबरी रस्त्यांमधील खड्याची समस्या कायमची सोडविण्यासाठी कॉंक्रीटचे रस्ते बांधत आहे. मात्र एकाच वेळेस हे शहरातील सर्व रस्ते कॉंक्रीटचे करता येणार नसल्याने पुढील पाच वर्षे तरी पनवेलकरांना रस्त्यातील खड्यांचा सामना करावा लागणार आहे. एकही शाळा महापालिकेने सिडको वसाहतींमध्ये मागील आठ वर्षात बांधू शकली नाही. राज्यात भाजपची सत्ता असताना सुद्धा राज्याचे शिक्षण खाते व ग्रामविकास विभागात असमन्वयामुळे पनवेल क्षेत्रातील शिक्षण विभागाचे हस्तांतरण रखडले. पालिकेची शिक्षणाची गंगा फक्त पनवेल शहर पुरतीच मर्यादित राहिली. सिडको वसाहती आणि ग्रामीण पनवेलमध्ये पालिकेची एकही शाळा नाही. मालमत्ता कराच्या वसूलीसाठी आग्रही असलेल्या पालिकेने निवडणूक काळात प्रशांत ठाकूर यांना मतदारांच्या रोषाचा सामना होऊ नये यासाठी करवसूलीला ब्रेक लावला आहे. परंतू हाच मालमत्ता कर यावेळच्या निवडणूकीत ठाकूरांच्या विरोधी प्रचाराचा मुख्य मुद्दा बनणार आहे. मालमत्ता कराच्या देयकामध्ये पालिका प्रशासनाने पाणी व शिक्षणकराची मागणी करधारकांकडून केली आहे. तशी वसूली सुद्धा सूरु आहे. परंतू या दोन्ही सुविधा पालिका देऊ शकली नाही. मागील आठ वर्षात पनवेलकरांच्या आरोग्यासाठी स्वताचे एक रुग्णालय पालिका बांधू शकले नाही. रस्त्यातील खड्डयामुळे वेळोवेळी अपघात होत आहे.

शाळांजवळील रस्ते अजूनही खड्यात हरवलेत. कॉंक्रीटचे रस्ते करण्याला पालिका प्राधान्य देत असले तरी डांबरी रस्त्यांवरील खड्डे मुक्त पनवेलची पनवेलकर प्रतिक्षेत आहेत. अशीच स्थिती ग्रामीण पनवेलच्या दिड लाख लोकवस्तीमधील मतदारांची आहे. खड्डे पडलेल्या रस्त्यातून वाट काढणे, प्रसुतीसाठी महिलांना आरोग्याचे रुग्णालय नसणे आणि दिवसातून सात वेळा तरी विजेचा खंडीत होणारा विजप्रवाह यामुळे ग्रामीण पनवेलकर वैतागले आहेत. आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या हाकेपासून पनवेलचा ग्रामीण भागातील ९० गावी आहे. मात्र विमानतळ आंतरराष्ट्रीय दर्जाचे आणि ग्रामस्थांना खेड्याच्या सुविधा मिळत नाही अशा स्थितीत आहेत. 

हेही वाचा…रस्त्यात टेम्पो पार्किंग जीवावर बेतले, अपघातात एक ठार 

शेकापचे चारवेळा आमदार राहीलेले मागील तीन वर्षांपासून तुरुंगात आहेत. भ्रष्टाचाराची आंघोळ शेकापने केली होती, त्यात सर्वानाच पावन करुन घेतले होते. आज एका ठिकाणच्या खड्यात विश्वकर्मा यांनी स्वत:ला पावन करुन घेतले आहे. पण हे खड्डे दुरुस्त करुन येथील मूलभूत सेवा मिळाव्यात यासाठी शासकीय यंत्रणेकडे पाठपुरावा हा आम्हीच करतो. म्हणून आमच्याकडून अपेक्षा व्यक्त केली जात आहे. त्याच पक्षाचे आमदार राज्याच्या विधान परिषदेमध्ये सुद्धा होते. त्यांनी काय बदल केला ते सांगा. आम्ही केलेल्या कामाची जंत्री वाचून दाखवू शकतो.  – प्रशांत ठाकूर, उमेदवार, भाजप महायुती

मी दररोज भेडसावणा-या पाणी व खड्डे या समस्येची सत्यस्थिती दाखविली आहे. सिडको वसाहतीमधील आम्ही नागरीक दररोज हे सहन करत आलोय. पावसाळ्यात घरात पाणी नाही, घराबाहेर रस्त्यातील खड्डयामुळे तळे साचले. ही आंघोळ म्हणजे सर्वसामान्य व्यक्तीचा सरकारी यंत्रणा आणि तीन वेळा निवडून आलेल्या आमदारांच्या निष्क्रियतेविरोधातील रोष आहे. हा राजकीय स्टंट नाही. – बबन विश्वकर्मा, पदाधिकारी, शेकाप