नवी मुंबई : नेरुळ रेल्वे स्थानक पश्चिमेला स्थानकालगतच पिरॅमिड सेंट्रिया या नव्याने होऊ घातलेल्या टॉवरच्या कामासाठी स्फोट घडवत असताना पदपथावरुन जात असलेल्या गर्भवती महिलेच्या डोक्यात या स्फोटामधील दगड पडून झालेल्या दुर्घटनेप्रकरणी नेरुळ पोलिसांनी गुन्हा दाखल केल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनी दिली आहे. तर दुसरीकडे या प्रकरणी पालिकेच्या नगररचना विभागाने नेरुळ येथील स्फोटाचे काम तात्काळ बंद करण्यात आले असून संबंधितांनी केलेल्या दुर्लक्षाबाबत कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आल्याची माहिती पालिकेच्यावतीने देण्यात आली आहे.
नेरुळ सेक्टर १० येथे पटेल या विकासकाच्या कामाच्या ठिकाणी मंगळवारी स्फोट घडवले जात असताना झालेल्या दुर्घटनेत महिलेच्या डोक्याला बारा टाके पडले होते. नेरुळ येथील या दुर्घटनेनंतर प्रशासकीय यंत्रणांना जाग आली आहे. सीवूड्स येथेही मागील काही महिन्यांपासून असेच मोठ्या प्रमाणात ब्लास्टिंग केल जात असल्याने येथील रहिवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न अधिक गंभीर बनला आहे. नेरुळ पोलिसांनीही संबंधितांवर गुन्हा दाखल केल्याची माहिती लोकसत्ताला दिली आहे. दुर्घटनेतील महिलेवर तेरणा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
हेही वाचा…अंमली पदार्थ तस्कराला मदत केल्याप्रकरणी पोलीस शिपायावर निलंबनाची कारवाई
शहरात पुनर्विकासाचे तसेच नव्याने बांधकाम होऊ घातलेल्या बहुमजली इमारतींची कामे वाशी व सीवूड्स, नेरुळ विभागात मोठ्या प्रमाणात सुरू असून बांधकाम प्रकल्पांच्या आजुबाजूला राहणाऱ्या नागरिकांना वेळीअवेळी होत असलेल्या या मोठमोठ्या यंत्रांच्या आवाजामुळे ध्वनी व वायू प्रदुषण होत आहे. नेरुळ येथील दुर्घटनेत संबंधित विकसकाने या ठिकाणचे ब्लास्टिंगचे काम हे मे. शिवम इन्टरप्रायजेस यांना दिले असून या कंपनीद्वारे आणखी दुसऱ्या कंपनीला काम दिले होते. त्यामुळे याबाबत पोलिसांमार्फत गुन्ह्याच्या अनुषंगाने अधिक तपास करण्यात येणार आहे.
नेरुळ रेल्वे स्थानकाजवळ या ब्लास्टिंगमुळे झालेल्या दुर्घटनेनंतर पालिकेच्या नगररचना विभागाचे अधिकारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले होते. त्यांनी माहिती घेऊन या ठिकाणचे ब्लास्टिंगचे काम बंद करण्याचे आदेश दिले. तसेच या कामातील हलगर्जीपणामुळे संबंधित विकासकाला कारणे दाखवा नोटीस बजावल्याची माहिती पालिका अधिकाऱ्यांनी दिली.
हेही वाचा…कृषी उत्पन्न बाजार समिती : शौचालय घोटाळा, एक माजी संचालक अटक तर दुसऱ्याची चौकशी, एपीएमसीत खळबळ
नेरुळ येथे ब्लास्टिंगच्या कामाबाबत मंगळवारी घडलेल्या दुर्घटनेत नेरुळ पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निश्चित तपास करून योग्य ती कारवाई करण्यात येत आहे. – तानाजी भगत, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, नेरुळ
नेरुळ येथील घटनेची प्रत्यक्ष पाहणी केली होती. त्यानुसार या ठिकाणी सुरु असलेले ब्लास्टिंगचे काम बंद करण्यात आले आहे. तसेच घडलेल्या दुर्घटनेमुळे संबंधितांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. – सोमनाथ केकाण, सहाय्यक नगररचना संचालक, नमुंमपा
हेही वाचा…शीव-पनवेल महामार्गावरील रात्रीच्यावेळी प्रवास सुरक्षित आहे का ?
ब्लास्टिंगचा दगड डोक्यात लागून १२ टाके पडले. अद्याप पत्नीवर उपचार सुरु आहेत. बुधवारी उशिरा घरी पाठवण्याची शक्यता आहे. परंतु बिल्डर, प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे आमच्या कुटुंबावर संकट ओढवले आहे. – हरिश कासुर्डे, जखमी महिलेचा पती