नवी मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपमध्ये आल्यानंतर २०१९मध्ये केवळ एका जागेवर समाधान मानावे लागलेल्या गणेश नाईक कुटुंबीयांनी आगामी विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर आक्रमक पवित्रा घेतला आहे. ऐरोली आणि बेलापूर या दोन्ही मतदारसंघांतून निवडणूक लढवण्याची जोरदार तयारी नाईक कुटुंबीयांनी केली असून प्रसंगी बेलापूरमधील अपक्ष लढवण्याचीही संदीप नाईक यांची तयारी आहे. मात्र, अपक्ष म्हणून लढतानाही भाजपच्या पदाधिकाऱ्यांना आपल्या पाठीशी ठेवण्याचे त्यांचे मनसुबे आहेत. त्यामुळे लोकसभेतील ‘सांगली पॅटर्न’ विधानसभेत बेलापूरमधून दिसण्याची शक्यता आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

बेलापूर मतदारसंघात भाजपच्या मंदा म्हात्रे या विद्यामान आमदार आहेत. या मतदारसंघावर भाजपचे नवी मुंबई अध्यक्ष संदीप यांनी दावा सांगितला असून रविवारी झालेल्या त्यांच्या वाढदिवसानिमित्त वाशी ते बेलापूर पट्ट्यात त्यांच्या समर्थकांनी जोरदार शक्तिप्रदर्शन केल्याचे पाहायला मिळाले. एरवी खैरणे एमआयडीसी येथील क्रिस्टल हाऊस येथील कार्यालयात वाढदिवस साजरा करणारे संदीप यांनी यंदा मात्र वाढदिवसाचे ठिकाण सीबीडी बेलापूर येथील पक्षाच्या कार्यालयात हलविले होते. या ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या वेगवेगळ्या कार्यक्रमांमधून संदीप यांचा उल्लेख ‘बेलापूरचे भावी आमदार’ असाच केला जात होता हे विशेष.

हेही वाचा >>>राष्ट्रीय महामार्गांची चाळण, जेएनपीए बंदराला जोडणाऱ्या दोन्ही महामार्गांवर खड्डेच खड्डे

सांगली लोकसभेची जागा उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला सुटल्यानंतर काँग्रेसचे विशाल पाटील यांनी अपक्ष निवडणूक लढवून जिंकली होती. सांगलीत काँग्रेसचे संपूर्ण संघटन विशाल यांच्या विजयासाठी मेहनत घेताना दिसला. बेलापूरमध्ये भाजपने पुन्हा मंदा म्हात्रे यांनाच उमेदवारी दिली तर अपक्ष रिंगणात उतरण्याची तयारी संदीप नाईक यांनी केल्याचे सांगितले जात आहे. भाजपचे शहर अध्यक्ष म्हणून यापूर्वीच संदीप यांनी पक्ष संघटनेवर आपल्या समर्थकांची वर्णी लावली आहे. त्यामुळे अपक्ष म्हणून रिंगणात उतरताना पक्षाचे संघटन आपल्या बाजूने राहील याची पुरेपूर आखणी संदीप यांच्या गोटात केली जात आहे. निवडणुकीपूर्वी बेलापूरचा हा ‘सांगली पॅटर्न’ भाजप श्रेष्ठींसाठीही डोकेदुखी ठरण्याची शक्यता आहे.

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Preparation of bjp ganesh naik to contest assembly elections 2024 from both airoli and belapur constituencies amy