जयेश सामंत-संतोष सावंत
नवी मुंबई : राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी अशा महिला सक्षमीकरण योजनेसह नवी मुंबई मेट्रो आणि सूर्या पाणी प्रकल्पाच्या शुभारंभानिमित्ताने ३० ऑक्टोबर रोजी नवी मुंबईत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात येणाऱ्या बहुचर्चित सोहळय़ाची मोठी लगबग मुंबई आणि नवी मुंबईच्या प्रशासकीय वर्तुळात पाहायला मिळत आहे.
एक लाख महिलांच्या उपस्थितीत उलवेलगत असलेल्या नवी मुंबई विमानतळ प्रकल्प परिसरातील भव्य पटांगणावर आयोजित करण्यात येणाऱ्या या सोहळय़ासाठी सहा लाख चौरस फुटांचा जर्मन हॅगर पद्धतीचा आच्छादन असलेला मंडप उभारला जाणार असून पाच हजार स्वच्छतागृहे, पाच लाख पिण्याच्या बाटल्या तसेच मोठी आरोग्य यंत्रणा या ठिकाणी तैनात केली जाणार आहे. चार हजार बसमधून राज्यभरातून महिलांना सभास्थळी आणले जाणार आहे. त्यासाठी स्वतंत्र वाहनतळाची सुविधा करण्यात आली आहे. मंडपामध्ये गरम वाफा येऊ नये यासाठी कूलर व वातानुकूलित यंत्रणा लावली जाणार आहे. या कार्यक्रमाची जबाबदारी एकाच इव्हेंट मॅनेजमेंट सव्र्हिस कंपनीकडे देण्याचे प्रयोजन केले आहे.
हेही वाचा >>>पनवेल पालिकेच्या तिजोरीत मालमत्ता करातून २०० कोटी जमा
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून आखण्यात आलेल्या महिला सक्षमीकरण योजनेचा शुभारंभ सोहळा पंतप्रधानांच्या उपस्थितीत व्हावा यासाठी गेल्या महिनाभरापासून सातत्याने प्रयत्न केले जात होते. पंतप्रधानांची ३० ऑक्टोबरची वेळ नक्की होताच गुरुवारी दिवसभर मुख्यमंत्री कार्यालयातील अधिकारी आणि निकटवर्तीयांनी नवी मुंबईतील वेगवेगळय़ा जागांची पाहणी केली. यानंतर उलवे परिसरास विमानतळ प्रकल्पालगत असलेल्या मोकळय़ा जागेवर हा कार्यक्रम करण्याचे निश्चित करण्यात आले आहे.
दहा महिन्यांत सहावा दौरा
पंतप्रधान नरेंद्र मोदी डिसेंबर २०२२ पासून ऑक्टोबर २०२३ पर्यंत सहा वेळा महाराष्ट्रात आले आहेत. समृद्धी मार्गाचे उद्धाटन तसेच इतर कार्यक्रमांसाठी ते महाराष्ट्रात आले. याच महिन्यात त्यांचे शिर्डी व नवी मुंबई असे दोन कार्यक्रम ठरले आहेत.
प्रकल्पांचा शुभारंभ, अधिकाऱ्यांचे दौरे
पंतप्रधानांच्या उपस्थितीत सिडकोचा नवी मुंबई मेट्रो प्रकल्प तसेच उरण-नेरुळ प्रकल्पातील उर्वरित स्थानकांचे उद्धाटन करण्यात येणार आहे. याशिवाय मुंबई महानगर विकास प्राधिकरणामार्फत वसई-विरार, मीरा-भाईंदर या शहरांच्या पाणीपुरवठय़ासाठी राबविण्यात आलेल्या सूर्या पाणीपुरवठा प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पणही पंतप्रधानांच्या हस्ते केले जाणार आहे. नवी मुंबई मेट्रो प्रकल्प आणि नेरुळ-उरण रेल्वे प्रकल्पातील अंतर्गत कामांची शनिवारी संबंधित विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पाहणी केली. उद्घाटनानंतर पंतप्रधान पेठपाडा ते आरबीआय या मेट्रो स्थानकादरम्यानचा प्रवास करण्याची शक्यता वर्तविली जात आहे.