गतवर्षीच्या तुलनेत नवीन कांद्याची आवक घटली
वाशीतील कृषी उत्पन्न बाजारात नवीन कांदा दाखल होण्यास सुरुवात झाली असली, तरीही जुन्या कांद्याला अधिक मागणी असल्यामुळे त्याच्या किमती चढय़ाच आहेत. शिवाय नवीन कांद्याची आवकही गतवर्षीच्या तुलनेत कमी असल्यामुळे सध्या कांद्याचे भाव चढेच राहणार आहेत. डिसेंबरनंतर कांद्याची आवक वाढून जानेवारीच्या सुमारास किमती कमी होण्याची शक्यता असली, तरीही गतवर्षीच्या तुलनेत यंदा कांद्याचे भाव काही अंशी चढेच राहतील, अशी शक्यता व्यापाऱ्यांनी वर्तवली आहे.
नव्या कांद्यात आद्र्रता अधिक असते त्यामुळे कुजण्याची प्रक्रिया वेगाने होते. त्यामुळे जुन्या कांद्याची आवक सुरू झाली असली, तरीही जुन्या कांद्याचे भाव १० रुपयांनी वाढले आहेत. उन्हाळी म्हणजेच रब्बीचा कांदा सहा महिने साठवता येतो, मात्र खरीप कांदा १ महिन्यापेक्षा जास्त काळ साठविता येत नाही, अन्यथा तो कुजू लागतो. त्यामुळे ग्राहक जुन्या कांद्याला पसंती देतात.
राज्यभरात लासलगाव, नाशिक, नगर येथील कांद्याची आवक सुरू झाली आहे. वाशी बाजारात रोज नवीन कांद्याच्या सुमारे ५० ते ५५ तर जुन्या कांद्याच्या ४० गाडय़ा दाखल होत आहेत. आणखी अडीच महिने नवीन कांद्यांचा हंगाम सुरू राहील. जानेवारीनंतर कांद्याचे भाव उतरतील, असे व्यपाऱ्यांचे म्हणणे आहे. नवीन कांदा घाऊक बाजारात १२ ते १८ रुपये, तर किरकोळ बाजारात ३५ रुपये प्रति किलोने विकला जात आहे. जुन्या कांद्याने घाऊक बाजारात २० ते ३० रुपये व किरकोळमध्ये ५० रुपयांवर पोहचला आहे.
परतीच्या पावसाचा फटका
परतीच्या पावसाने भाजीपाल्या बरोबर कांद्याचेही नुकसान झाले आहे. त्यामुळे गतवर्षीच्या तुलनेत यंदा जुन्या कांद्या बरोबर नवीन कांद्याची आवक घटली आहे. नोव्हेंबर २०१६ मध्ये रोज सरासरी ७० ते ९० गाडय़ा कांद्याची आवक होत होती. यंदा हे प्रमाण ५० गाडय़ांवर आले आहे. अवेळी पडलेल्या पावसामुळे यावर्षी ३० रुपयांनी दरवाढ झालेली आहे. गेल्या वर्षी २०रु प्रतिकिलो मिळणाऱ्या जुन्या कांद्याने आज पन्नाशी गाठली आहे. करकोळ बाजारात १५ रुपयांत उपलब्ध असलेल्या नवीन कांदा आता ३५ रुपयांवर पोहचला आहे.