पूनम सकपाळ, नवी मुंबई
मागील एक ते दीड महिन्यांपासून टोमॅटोच्या दराने उच्चांक गाठला असून बाजारात राज्यातील आवक वाढेपर्यंत आणखीन महिनाभर टोमॅटोचे दर चढेच राहतील अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. एपीएमसीत टोमॅटो दर वधारत आहेत. बुधवारी एपीएमसीत उच्चतम प्रतिचा टोमॅटो प्रतिकिलो १३० रुपयांनी विक्री झाला आहे.
हेही वाचा >>> नवी मुंबई : व्ही.आय.पी. अडकले वाहतूक कोंडीत… पोलिसांची लगबग ….
सर्वच ठिकाणी किरकोळ आणि घाऊक बाजारात टोमॅटोचे दर वाढले आहेत. यंदा टोमॅटोला कवडीमोल बाजारभाव मिळत होता. त्यामुळे दरम्यानच्या कालावधीत कित्येक टोमॅटो शेतकऱ्यांनी उत्पादनाचा खर्च ही निघत नसल्याने रस्त्यावर टोमॅटो फेकले होते. तर काहींनी टोमॅटो लागवड केली नाही. त्यामुळे सध्या टोमॅटो उत्पादन घटले आहे. मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी असल्याने दर वधारत आहेत. यंदा टोमॅटोच्या दराने पहिल्यांदाच उच्चांक गाठला आहे. आणखीन महिनाभर टोमॅटोचे चढेच राहतील अशी महिती व्यापाऱ्यांनी दिली आहे.
बुधवारी एपीएमसीत टोमॅटोच्या २५ गाड्या दाखल झाल्या आहेत. यामध्ये ३०% ते ४०% बंगळुरू येथून टोमॅटो दाखल होत आहेत, तर उर्वरित राज्यातील टोमॅटो आहे. पुढील महिन्यात राज्यातील टोमॅटो आवक वाढेल. मात्र तोपर्यंत टोमॅटोचे दर चढेच राहितील असे मत व्यक्त होते आहे. राज्यातील टोमॅटो आवक जरी वाढली तरी प्रतिकिलो टोमॅटो ५०-९० रुपयांवर असतील असे शक्यता वर्तविण्यात येत आहे. घाऊक बाजारात प्रतिकिलो टोमॅटो कमीत कमी १००रुपये तर जास्तीत जास्त १३०रुपये तर किरकोळ बाजारात १६० रुपयांहुन अधिक दराने विक्री होत आहे.
हेही वाचा >>> माथेरानच्या मंकी पॉईंट जवळ दरड कोसळली, धोदाणी ग्रामस्थांना सतर्कतेचा इशारा
एपीएमसीत टोमॅटोची आवक कमी आहे,त्यामुळे दर वधारले आहेत. बाजारात सध्या बंगळुरू आणि राज्यातील टोमॅटो आवक आहे. मात्र आणखीन महिनाभर टोमॅटोचे दर चढेच राहतील. महिन्याभराने राज्यातील टोमॅटोची आवक वाढेल त्यावेळी टोमॅटोचे दर उतरण्याची शक्यता आहे. मात्र हे देखील सर्व पावसावर अवलंबून आहे.
संतोष नवले, व्यापारी, एपीएमसी