पनवेल : खारघर येथील इस्कॉन मंदिराच्या लोकार्पण सोहळा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बुधवारी (ता.१५) होणार असल्याने नवी मुंबई पोलीस पंतप्रधानांच्या सुरक्षेसाठी सज्ज आहेत. खारघर उपनगरामधील ९ एकर जागेवर इस्कॉन मंदिराची उभारणी झाल्याने उपनगराची खऱ्या अर्थाने अध्यात्मिक ओळख देशपातळीवर होणार आहे. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय श्रीकृष्णाच्या भाविकांसाठी खारघर उपनगर हे भक्तीस्थान होणार आहे. बुधवारी होणाऱ्या कार्यक्रमात पंतप्रधानांची सुरक्षा आणि सुमारे पाच हजार भाविकांची सोय ध्यानात घेऊन नवी मुंबई पोलिसांनी सुरक्षेचे कडे आखले आहे. पंतप्रधान मोदी यांच्या आगमनापासून ते कार्यक्रमाचे मुख्य अतिथी जाईपर्यंत खारघर येथील टाटा कर्करोग रुग्णालय ते इस्कॉन मंदिर या मार्गावरील वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

खारघरमध्ये सुमारे दोन हजार वाहने दाखल होतील या अंदाजाने पोलिसांनी तीन वेगवेगळ्या ठिकाणी तात्पुरते वाहनतळ आणि वाहनतळापर्यंत दिशा दाखविण्यासाठी पाचशेहून अधिक पोलिसांचा बंदोबस्त तयार ठेवला असल्याची माहिती नवी मुंबईच्या वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त तिरुपती काकडे यांनी दिली. याशिवाय नवी मुंबई पोलीसांचा शहर भर आणि कार्यक्रम ठिकाणी बंदोबस्त लावण्यात आला आहे. नवी मुंबईचे पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी सोमवारी याच पोलीस बंदोबस्ताचा आढावा घेतला. नवी मुंबई पोलिसांनी जाहीर केलेल्या वाहतूक नियंत्रण अधिसूचनेनूसार पुढील बदल करण्यात आले आहेत.

हेही वाचा : नवी मुंबई : सिडको मंडळाचे वाहनतळ धोकादायक स्थितीत

प्रवेश बंद:

ओवे गाव पोलीस चौकी ते जे. कुमार सर्कल ते ग्रीन हेरिटेज मार्गावर दोन्ही बाजूंनी प्रवेश बंद राहणार आहे. तसेच गुरुद्वारा चौक ते जे. कुमार सर्कल ते बी. डी. सोमाणी शाळेच्या मार्गावरील दोन्ही बाजूंनी वाहनांना बंदी आहे. तसेच इस्कॉन मंदिर गेट नं. १ ते इस्कॉन मंदिर गेट नं. २ या मार्गावर बंदी असणार आहे. या बंदमध्ये व्हीआयपी वाहने, पोलीस वाहने, अत्यावश्यक सेवा, शासकीय वाहने आणि कार्यक्रमासाठी आलेल्या वाहनांना सवलत दिली आहे.

येथे वाहने उभी करु नये

हिरानंदानी जंक्शन ते उत्सव चौक ते ग्रामविकास भवन ते गुरुद्वारा ते ओवेगाव चौक दोन्ही मार्गिकांवर वाहने उभी करु नये. ओवे गाव पोलीस चौकी ते ओवे क्रिकेट ग्राउंड (हेलीपॅड), ग्रामविकास भवन ते ग्रीन हेरिटेज ते सेंट्रल पार्क मेट्रो स्टेशन, जे. कुमार सर्कल ते ग्रीन हेरिटेज सकाळी मार्गाच्या दुहेरी बाजूस सकाळी सहा वाजेपासून कार्यक्रम संपेपर्यंत वाहने उभी करु नयेत.

हेही वाचा : नवी मुंबई : एपीएमसीत लालचुटूक स्ट्रॉबेरींचा बहर, दरातही घसरण

या मार्गाचा वापर करा

मार्ग क्र. १: ओवेगाव चौक → डावीकडे/उजवीकडे वळून इच्छित स्थळावर.

मार्ग क्र. २: ग्रामविकास भवन/प्रशांत कॉर्नर/शिल्प चौक/सेंट्रल पार्क मेट्रो स्थानकातून इच्छित मार्गांवर वळण.

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Prime minister narendra modi navi mumbai visit police security tightened know traffic route changes css