पनवेलः १४ ते १७ ऑक्टोबर या दरम्यान देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बहुचर्चित नवी मंबई मेट्रो रेल्वेचे उद्घाटन होईल अशी चर्चा होती. मात्र आता २६ ऑक्टोबर ही नवीन तारीख सरकारी प्रशासनाच्या अधिका-यांसमोर आली आहे. २६ ऑक्टोबरला पंतप्रधान मोदी हे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे काम सूरु असलेल्या ठिकाणी महिला सक्षमीकरणाच्या कार्यक्रमासाठी थेट येणार आहेत. याचवेळी ते मेट्रो रेल्वेचे उदघाटन करुन त्यावेळी मेट्रोची सफर करतील असे नियोजन केले जात आहे.अद्याप या नवीन तारखेविषयी सरकारी प्रशासनातील अधिका-यांनी कोणताही दुजोरा दिला नसला तरी खासगीमध्ये अधिकाऱ्यांना या तारखेला निश्चित तारीख समजून नियोजन करण्याचे आदेश राज्य सरकारने दिल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.
हेही वाचा >>> नवी मुंबई महापालिका अभियंता स्वप्निल देसाई यांचे आंतरराष्ट्रीय स्तरावर सर्व स्तरांतून अभिनंदन, नक्की कारण काय?
बेलापूर ते पेणधर या मार्गावर नवी मुंबई मेट्रो रेल्वे धावणार आहे. मागील १० वर्षांपासून या रेल्वेचे काम सूरु होते. ३०६३ कोटी रुपये या प्रकल्पासाठी खर्च केले जाणार होते. त्यापैकी २९५४ कोटी रुपयांत या मेट्रोसाठी खर्च केला गेला आहे. ९८ हजार प्रवाशांना या मेट्रोसेवेचा लाभ होणार आहे. नवी मुंबई मेट्रो असे नाव या प्रकल्पाचे असले तरी प्रत्यक्षात बेलापूर, खारघर आणि तळोजा वसाहत या दरम्यानच्या प्रवाशांना या सेवेचा सर्वाधिक लाभ होणार आहे. गारेगार प्रवास १० ते ४० रुपयांमध्ये प्रवाशांना करता येणार आहे. खारघरवासियांचे मागील ५ वर्षांपासूनचे स्वप्न या सेवेमुळे पुर्ण होणार आहे. देशाचे पंतप्रधान मोदी हे या रेल्वेतून प्रवास करतील अशी अपेक्षा खारघरच्या नागरिकांना आहे.
हेही वाचा >>> भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे १७ ऑक्टोबर रोजी नवी मुंबईमध्ये; महाविजय अभियानाचे आयोजन
पंतप्रधान मोदी हे खारघर येथील सेक्टर २८ ते ३१ येथील आंतरराष्ट्रीय कार्पोरेट मैदानावर महिला सक्षमीकरणाच्या कार्यक्रमासाठी येणार असल्याने नवी मुंबई पोलीस, रायगड जिल्हाधिकारी कार्यालय, सिडको महामंडळ, पनवेल महापालिका आणि नवी मुंबई महापालिका ही सर्वच सरकारी प्रशासनातील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी खारघर वसाहतीच्या परिसरातील स्वच्छता व सुशोभिकरणाकडे विशेष लक्ष केंद्रीत केले होते. महामार्गावरील झाडे झुडपे सुद्धा कापण्याचे काम सूरु केले होते. मात्र खारघर येथील कार्पोरेट पार्कच्या मैदानावरील पंतप्रधान मोदी यांच्या कार्यक्रमासाठी पंतप्रधान कार्यालय आणि मुख्यमंत्री कार्यालयातील आपसातामधील संवादानंतर हे ठिकाण नामंजूर करण्यात आल्याचे समजते. १६ एप्रीलला खारघर येथील कार्पोरेट पार्कच्या मैदानावर महाराष्ट्र शासनातर्फे महाराष्ट्र भूषण पुरस्कार २०२२ हा सोहळा आयोजित केला होता. यामध्ये दासभक्तांचा मृत्यू झाला होता. सोहळ्यात मान्यवरांसाठी शामियाना आणि दासभक्तांसाठी उन्हाचे थेट चटके असे नियोजन केल्यामुळे पाण्याने व्याकुळलेल्या राज्यभरातील दासभक्तांमध्ये चेंगराचेंगरी झाली. खारघरच्या दुर्घटनेची पुनरार्वृत्ती टाळण्यासाठी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पाचे कोंबडभुजे गावाजवळील मोकळी जागा निवडण्यात आली आहे. या कार्यक्रमासाठी राज्यभरातून एक लाख महिला या कार्यक्रमासाठी येणार आहेत. या महिलांसाठी नियोजन चोख करण्याची जबाबदारी राज्य सरकारची असणार आहे.