नवी मुंबई : मुंबई महानगर प्रदेशातील वेगवेगळ्या प्रकल्पांच्या लोकार्पणासाठी शुक्रवारी नवी मुंबईच्या दौऱ्यावर येणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वागताला ठाणे, रायगड जिल्ह्यातील भूमीपुत्र असणारा आगरी-कोळी समाजातील पारंपारिक पद्धतीचा साज चढविला जाणार आहे. शिवडी- न्हावाशेवा अटल सेतूची पहाणी केल्यानंतर मोदी यांचा ताफा नवी मुंबईच्या दिशेने चिर्ले परिसरात येईल. तेथून नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळापर्यत साडेपाच किलोमीटर अंतरात पंतप्रधानांच्या स्वागतासाठी दोन्ही बाजूला लेझीम, ढोल, ताशे तसेच आगरी-कोळी परंपरेतील संगीत, नृत्याचे सादरीकरण केले जाणार आहे.
या मराठमोळया स्वागताची जय्यत तयारी पनवेल, उरण पट्टयात सुरु असून गुरुवारी सायंकाळी या मार्गावरील वाहतूक थांबवून रंगीत तालीमही उरकण्यात आली. पंतप्रधानांच्या हस्ते शुक्रवारी होणाऱ्या वेगवेगळ्या प्रकल्पांच्या लोकार्पण सोहळ्याच्या निमीत्ताने नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या जागेवर साडेसहा लाख चौरस फुटाचा विस्तीर्ण असा मंडप उभारण्यात आला आहे. गेल्या दोन दिवसांपासून पंतप्रधानांसाठी नियुक्त असणाऱ्या विशेष सुरक्षा दलांनी या संपूर्ण परिसराचा ताबा घेतला आहे.
हेही वाचा… अटल सेतूच्या शुभारंभाला जय श्रीराम चा नारा
राज्यभरातील वेगवेगळ्या पोलीस आयुक्तालयाच्या क्षेत्रातून या दौऱ्याच्या बंदोबस्तासाठी चार हजार पोलिसांचा विशेष बंदोबस्त ठेवण्यात आला असून गुरुवारी सकाळपासूनच याठिकाणची सुरक्षा व्यवस्था तसेच वेगवेगळ्या सुविधांच्या उभारणीचा फेरआढावा घेणे सुरु होते. सायंकाळी उशीरा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह मुंबई प्रदेश विकास प्राधिकरण, सिडको तसेच जिल्हा प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याठिकाणची पाहणी केली. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी शिवडी-न्हावाशेवा अटल सेतूची लहानशी रपेट मारत या रस्त्याची येथील टोलनाक्यांची तसेच इतर सुविधांची पहाणी केली.
या पाहणी दरम्यान पंतप्रधानांच्या स्वागतासंबंधी भाजपचे पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर आणि उरणचे आमदार महेश बालदी या दोघांशी मुख्यमंत्र्यांनी सविस्तर चर्चाही केली. ढोल, ताशांची मिरवणुक, गर्दीचे नियोजन शिवडी-न्हावाशेवा अटलसेतूची पहाणी केल्यानंतर पंतप्रधानांचा ताफा नवी मुंबईच्या दिशेने निघणार आहे.
हेही वाचा… विश्लेषण : शिवडी-न्हावाशेवा अटल सेतू मुंबई आणि नवी मुंबईसाठी किती फायदेशीर? काय आहेत वैशिष्ट्ये?
येथील चिर्ले चौकापासून पंतप्रधानांचे मराठमोळया पद्धतीने स्वागत केले जाणार आहे. चिर्ले ते विमानतळ अशा साडेपाच किलोमीटरच्या अंतरात पंतप्रधानांच्या स्वागतासाठी दोन्ही बाजूंना नागरिकांचे जथ्थे असतील अशी व्यवस्था केली जाणार आहे. ठाणे आणि रायगड जिल्ह्याचा भूमीपुत्र असलेल्या आगरी-कोळी समाजातील वेगवेगळ्या परंपरा, कलाविष्काराचे दर्शन पंतप्रधानांना घडविण्याचा प्रयत्न यावेळी केला जाणार आहे.
विशेष म्हणजे सागरी सेतूला दोन्ही बाजूंनी लहान लहान होड्यांमधून पंतप्रधानांच्या स्वागतासाठी १५० फुट उंचीचे फुगे सोडण्यात येणार आहे, अशी माहिती आमदार बालदी यांनी लोकसत्ताला दिली. या विमानतळाला प्रकल्पग्रस्तांचे नेते दि.बा.पाटील यांचे नाव देण्याचा आग्रह केला जात आहे. यानिमीत्ताने या मागणीचा पुर्नरुच्चारही केला जाईल असेही सुत्रांनी सांगितले.