लोधिवली येथील शाळेच्या विद्यार्थिनींच्या प्रयोगाची राष्ट्रीय पातळीवर दखल
नवी मुंबई : सॅनिटरी नॅपकिनच्या निर्मितीसाठी वापरण्यात येणाऱ्या प्लास्टिकला पर्याय म्हणून खालापूर तालुक्यातील लोधिवली येथील रिलायन्स फाऊंडेशन शाळेच्या मराठी माध्यमातील तीन मुलींनी बांबूपासून सॅनिटरी पॅड बनवण्याचा प्रयोग केला आहे. त्यांचा हा प्रयोग २६ व्या राष्ट्रीय बालवैज्ञानिक परिषदेत ७४ प्रकल्पांना मागे टाकून अव्वल ठरला आहे. आता हा प्रकल्प ३ ते ७ जानेवारीला पंजाब येथे होणाऱ्या इंडियन सायन्स काँग्रेसमध्ये राज्याचे प्रतिनिधित्व करणार आहे.
देशात सर्वत्र प्लास्टिक बंदीचे विचार मंथन सुरू आहे. राज्याने प्लास्टिकच्या भस्मासुरावर बंदी घातली आहे. न्यायालयाच्या आदेशाने काही प्लास्टिक बंदीला मुदत देण्यात आलेली आहे. त्यामुळे येत्या काळात सरसकट प्लास्टिक बंदी होईल, अशी आशा व्यक्त केली जात आहे. पण यात प्लास्टिकचा आधार घेऊन बनविण्यात येणाऱ्या सॅनिटरी नॅपकिनचे काय, असा प्रश्न सतावत आहे.
देशात अलीकडे सॅनिटरी नॅपकिन वापरणाऱ्या महिलांची संख्या वाढली आहे मात्र त्याची विल्हेवाट कशी लावावी, हा प्रश्न अद्याप अनुत्तरित आहे. त्यामुळे घराजवळची कचराकुंडी किंवा उघडय़ावर वापरलेल्या सॅनिटरी नॅपकिन टाकण्याची सवय झालेली
आहे. वैद्यकीय घनकचरा असलेल्या या सॅनिटरी नॅपकिनची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावली जात नसल्याने आरोग्याचा प्रश्न निर्माण होत आहे. खालापूर तालुक्यातील लोधिवली येथील रिलायन्स फाऊंडेशनच्या हिमानी जोशी, पूर्वा बेलगल्ली, आणि केतकी लबडे या तीन विद्यार्थिनींनी आपल्या प्रयोगशील विज्ञान
शिक्षिका वैष्णवी मोडक व उपप्राचार्य सुहास सबनीस यांच्या मार्गदर्शनाखाली नुकत्याच उस्मानाबाद येथे झालेल्या राष्ट्रीय बालवैज्ञनिक परिषदेत इको फ्रेंडली अर्थात बांबू नॅपकिनचा प्रयोगाचे प्रदर्शन केले.
राज्यातील विविध शाळांतून ७४ प्रकल्प या परिषदेत मांडण्यात आले होते मात्र अंतिम फेरीत शिल्लक राहिलेल्या ३० प्रकल्पांत रिलायन्स शाळेच्या इको फ्रेंडली सॅनिटरी नॅपकिनने बाजी मारली. कापसापेक्षा बांबू नॅपकिन हा जास्त शोषण करू शकतो हे या प्रयोगात सिद्ध करण्यात आले.
हा प्रकल्प राज्यात सर्वोत्तम ठरला आहे. या प्रकल्पाची माहिती देताना हिमानी जोशी हिने दाखविलेल्या हजरजबाबीपणाने या प्रकल्पाचे महत्त्व स्पष्ट करून दिले. त्यामुळे ३ ते ७ जानेवारी रोजी पंजाब येथे होणाऱ्या इंडियन सायन्स काँग्रेसच्या अधिवेशनात हा प्रकल्प राज्याचे प्रतिनिधित्व करणार आहे. रिलायन्सच्या शाळेतील या आगळ्यावेगळ्या प्रयोगाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
सॅनिटरी नॅपकिनसाठी वापरण्यात येणारे प्लास्टिक ही एक मोठी समस्या निर्माण झालेली आहे. महिला आरोग्याच्या दृष्टीने सॅनिटरी नॅपकिन आवश्यक आहे. मात्र त्याची विल्हेवाट लावणे कठीण आहे. आपण केवळ प्लास्टिक, थर्माकॉल, आणि प्लास्टर ऑफ पॅरिसच्या कचऱ्याचा विचार करतो. सॅनिटरी कचऱ्याचा देखील विचार आत्तापासून होणे गरजेचे आहे. त्यासाठी आमचा हा छोटासा प्रयत्न आहे.
-वैष्णवी मोडक, विज्ञान शिक्षिका, रिलायन्स फाऊंडेशन शाळा