पूनम सकपाळ
नवी मुंबई : किरकोळ बाजारात फ्लॉवरच्या (फुलगोबी) भाजीला किलोसाठी ग्राहकाला १०० रुपये मोजावे लागत असताना साडेआठशे किलोच्या उत्पादनासाठी शेतकऱ्याला केवळ साडेनऊ रुपये इतका क्षुल्लक नफा मिळाल्याचा प्रकार ‘एपीएमसी’ बाजारात समोर आला आहे. दलालांच्या साखळीमुळे शेतकऱ्यांच्या पिळवणुकीच्या व्यथा कित्येक दशके बदलल्या नसल्या, तरी साडेआठ क्विंटल फ्लॉवर पिकविण्यासाठी लागलेली मेहनत, मानवी श्रम यांसाठी शेतकऱ्याला मिळालेल्या किमतीची वेदना चटका लावणारी आहे.
शेतकऱ्यांची हक्काची बाजारपेठ समजल्या जाणाऱ्या कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतकरी थेट शेतमाल घेऊन आला की त्याची हरप्रकारे अडवणूक आणि तोच शेतमाल दलालामार्फत विक्रीस आला, की त्याला चढय़ा किमतीने दर मिळत असल्याचे प्रकार सध्या राज्यात सुरू आहेत. या साखळीमुळे मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीतून शेतकरी हद्दपार झाला असून त्यांची जागा दलालांनी घेतली असल्याचे चित्र आहे.
एका शेतकऱ्याने सांगितले की, जेंव्हा एपीएमसी बाजारात शेतमाल येतो. तेव्हा त्या शेतमालाचा वाहतूक , हमाली, वजनप्रक्रिया यांवर प्रतिकिलो मागे चार रुपये खर्च येतो. किरकोळ बाजारात शंभर रुपये प्रतिकिलो दराने फ्लॉवर विकला जात असताना शेतकऱ्याला मात्र प्रतिकिलो ४ ते १६ रुपये मिळतात. त्यातून वाहतूक खर्च आणि हमाली वजा केली तर आमच्या चहा -पाण्याचा खर्चही निघत नाही.
शेतकऱ्यांना त्यांच्या शेतमालाचा योग्य दर मिळावा म्हणून केंद्र सरकारकडून शेतमालावरील नियमनमुक्ती उठविण्यात आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना शहरात भाजीपाल्याची थेट विक्री करण्याची मुभा मिळाली आहे. मात्र सर्वच शेतकऱ्यांना थेट विक्री करणे शक्य होत नाही. त्यामुळे शेतकरी त्यांचा शेतमाल स्थानिक बाजारात किंवा मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत विक्रीसाठी आणतात. पण तेथे त्यांना नुकसानीस सामोरे जावे लागते.
बाजारभाव काय?
‘एपीएमसी’ घाऊक बाजारात फ्लॉवर कमीत कमी १६ ते जास्तीत जास्त ३० रुपये प्रतिकिलो दराने तर किरकोळ बाजारात ८० ते १०० रुपये प्रतिकिलो किलो दराने विकला जात आहे. शेतकऱ्याच्या हातात मात्र तीन ते चार रुपयेही मिळत नाहीत.
कमी दर का?
पुणे येथील शेतकरी अभिषेक दरेकर यांनी सांगितले की, पुण्याच्या मांडवगाव फराटा या स्थानिक बाजारात आम्हाला फ्लॉवरला सध्या २० ते २५ रुपये दर मिळत आहे. येथून अडते म्हणजे दलाल खरेदी करून २८ ते ३० रुपयांना एपीएमसी बाजारात विक्री करतात. आम्ही आमचा शेतमाल घेऊन थेट बाजारात विक्रीसाठी आणला तर फ्लॉवरला कमीत कमी ३ ते १६ रुपये दर मिळतो.
झाले काय?
पुणे जिल्ह्यातील शिरूर येथील शेतकरी किसन फराटे यांनी व्यापारी सूर्यकांत शेवाळे यांच्याकडे ११ ऑगस्ट रोजी आपला आठशे किलोचा फ्लॉवर पाठवला. या सर्व मालाला एकूण २ हजार ६८४ रुपये इतकाच दर आला. यातून वाहतूक भाडे, हमाली आणि वजनखर्चापोटी २ हजार ६७५ रुपये वळते करून घेण्यात आले. त्यामुळे शेतकऱ्याच्या हातात फक्त ९ रुपये ५० पैसे आले.
‘एपीएमसी’ बाजारात मी ८५० किलो फ्लावर विक्रीसाठी आणला होता. त्यासाठी मला केवळ ९.५० रुपये मिळाले. याबाबत तक्रार करण्याचे सांगितल्यानंतर मला व्यापारी शेवाळे यांनी गप्प बसण्यासाठी एक हजार रुपये दिले. माझे इतकेच म्हणणे आहे की, शेतकऱ्यांना त्यांच्या शेतमालाचा योग्य मोबदला मिळावा. नाहीतर नाहीतर तो शेती का करेल?
-किसन फराटे, शेतकरी, शिरूर.