नवी मुंबई : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते स्व. दि.बा. पाटील यांच्या नावाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हिरवा कंदील दिल्याचे वृत्त नवी मुंबई, पनवेल व उरणमध्ये पसरताच प्रकल्पग्रस्तांनी या भूमिकेचे स्वागत केले आहे. वाशीत एक छोटी मिरवणूक काढून फटाकेही फोडण्यात आले. यावेळी आतापर्यंत दि. बा.पाटील यांच्या नावासाठी केलेला संघर्ष फळास आल्याच्या भावनाही यावेळी प्रकल्पग्रस्तांनी व्यक्त केल्या.
विनानतळाला स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाचा प्रस्ताव सिडकोकडून राज्य शासनाकडे गेल्यापासून प्रकल्पग्रस्तांत तीव्र नाराजी होती. त्यांच्या बाळासाहेब यांच्या नावाला विरोध नव्हता. मात्र प्रकल्पग्रस्तांसाठी ज्यांनी आपले आयुष्य वेचले त्या दि. बा. पाटील यांचे नाव देण्याची मागणी त्यानंतर जोर धरत अनेक आंदेलने झाली. गेल्या आठवड्यातही एक आंदोलन करीत दि. बा.पाटील यांचे नाव देईपर्यंत संघर्ष करणार आशा भावना प्रकल्पग्रस्तांनी व्यक्त केल्या होत्या. अखेर शिवसेनेने नरमाईची भूमिका घेत प्रकल्पग्रस्तांच्या मागणीचा सकारात्मक विचार केला आहे. त्यामुळे नवी मुंबई, उरण, पनवेलसह ठाणे व पालघर जिल्ह्यातील प्रकल्पग्रस्तांनी आनंद व्यक्त केला आहे.
वाशी येथे नामकरण समितीचे मुख्य समन्वयक दशरथ भगत यांनी ढोलताशांसह आनंद व्यक्त करीत फटाके फोडले. पाऊस असतानाही छोटेखानी मिरवणूकही काढण्यात आली. राज्यात एकनाथ शिंदे यांचे बंड आणि त्यामुळे शिवसेनेने सर्वत्र स्थानिक नागरिकांशी संवाद कार्यक्रम सुरू केले आहेत. यामुळे हे शक्य झाले असे मत प्रकल्पग्रस्त नेते निशान भगत यांनी व्यक्त केली आहे. तर शिवसेनेचे रायगड जिल्हाध्यक्ष शिरीष घरत यांनी उद्धव ठाकरे यांनी दि. बा. पाटील यांच्या कार्याचा गौरव करीत त्यांच्या नावाला माझा कधीच विरोध नव्हता असे सांगितले आहे. या निर्णयाने पालघर, मुंबई, रायगड व ठाण्यातील प्रकल्पग्रस्तांना निश्चित समाधान आणि आनंद झाला आहे असे सांगितले.
हा लढा दि. बा. पाटील यांच्या नावासाठी होता. शिवसेनेने याबाबत सकारात्मक भूमिका घेतल्याचे आम्ही स्वागत करतो. यासाठी आतापर्यंत केलेला संघर्ष फळास आला, याचा आनंद आहे.
दशरथ भगत, मुख्य समन्वयक, प्रकल्पग्रस्त नामकरण समिती