नवी मुंबई : मुख्यमंत्री यांच्या संकल्पनेतून ‘१०० दिवस कृती आराखडा’ हा उपक्रम राबवण्यात आला होता. या उपक्रमांतर्गत नवी मुंबई महापालिकेने प्रशासकीय कार्यात गती देत अधिकारी, कर्मचारी आणि शिक्षक कल्याणासाठी पावले उचलली आहेत. यामध्ये स्वच्छतेपासून लोकाभिमुख कार्यप्रणाली राबवत, ऑनलाइन सेवासुविधांवर भर देण्यात आला आहे. तसेच आठ संवर्गातील ९१ अधिकारी-कर्मचाऱ्यांना पदोन्नती तसेच १८ संवर्गातील ८० अधिकारी, कर्मचाऱ्यांना आश्वासित प्रगती योजना लागू करण्यात आली आहे.
मुख्यमंत्री यांच्या संकल्पनेतून नवी मुंबई महापालिकेच्यावतीने १०० दिवस कृती आराखडा उपक्रम राबवण्यात आला होता. नवी मुंबई पालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली, आणि अतिरिक्त आयुक्त सुनील पवार यांच्या नियंत्रणाखाली या उपक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करण्यात आली. या कृती आराखड्यामध्ये नवी मुंबईतील नागरिकांसाठी विविध सोयीसुविधा राबवण्यात आल्या आहेत. त्यात जन्म, मृत्यू आणि विवाह नोंदणीसाठीची प्रक्रिया अद्ययावत करण्याचे आदेश आयुक्तांकडून देण्यात आले होते. त्याचप्रकारे आता या आराखड्यात प्रशासन आणि शिक्षण विभागाने मिळून ९७ अधिकारी-कर्मचारी-शिक्षक यांना पदोन्नती दिली आहे. तसेच, २०३ जणांना तीन लाभांची सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना आणि वरिष्ठ वेतनश्रेणी लागू करण्यात आली आहे. यामध्ये प्रशासन विभागाचे उपआयुक्त शरद पवार आणि पदोन्नती निवड समितीच काम पाहिले. ११ एप्रिल रोजी एकाच दिवशी १२ संवर्गातील ८२ अधिकारी- कर्मचारी यांना पदोन्नती, तर १६ संवर्गांतील ७७ जणांना आश्वासित प्रगती योजनेचा लाभ देण्यात आला. शिक्षण विभागाच्या उपआयुक्त संघरत्ना खिल्लारे यांच्या नेतृत्वाखाली ६ शिक्षकांना पदोन्नती आणि १२३ शिक्षकांना वरिष्ठ वेतनश्रेणी देण्यात आली.
पदोन्नती आणि योजनेचे लाभार्थी
प्रशासन विभागातील पदोन्नती मिळालेल्या संवर्गात उपआयुक्त, कार्यकारी अभियंता, सहायक आयुक्त, निवासी वैद्यकीय अधिकारी, सहायक अभियंता, समाजविकास अधिकारी, समाजसेवक, सिस्टर-इन-चार्ज, लिपिक, टंकलेखक यांचा समावेश आहे. तर आश्वासित प्रगती योजनेअंतर्गत लाभार्थ्यांमध्ये प्रशासकीय अधिकारी, लेखा अधिकारी, वैद्यकीयतज्ज्ञ, औषधनिर्माता, स्वच्छता निरीक्षक, ड्रायव्हर ऑपरेटर, अग्निशमन प्रणेता, आरोग्य सहायक, माहिती नोंदणीकार, मदतनीस यांचा समावेश आहे.
सकारात्मक परिणाम?
एप्रिल २०२४ पासून आतापर्यंत २३१ जणांना पदोन्नती देण्यात आली. तर, ४०२ जणांना आश्वासित प्रगती योजना आणि वरिष्ठ वेतनश्रेणीचा लाभ मिळाला. महापालिका कर्मचाऱ्यांच्या दैनंदिन कामकाजावर याचा सकारात्मक परिणाम होणार असून, नागरिकांना उत्तम सेवा सुविधा पूर्ततेसाठी तसेच शैक्षणिक गुणवत्तावाढ होण्यासाठी ही बाब उपयोगी ठरणार आहे.